बेस्ट कर्मचाऱ्यांना हवी ४० टक्के पगारवाढ

By Admin | Published: May 17, 2016 05:34 AM2016-05-17T05:34:08+5:302016-05-17T05:34:08+5:30

बेस्ट कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्टचे महाव्यवस्थापकांना दिला

40% salary increase for best employees | बेस्ट कर्मचाऱ्यांना हवी ४० टक्के पगारवाढ

बेस्ट कर्मचाऱ्यांना हवी ४० टक्के पगारवाढ

googlenewsNext


मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्टचे महाव्यवस्थापकांना दिला आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली आहे. त्यामुळे नव्या वेतन करारात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ देण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
याआधी २००६ ते २०११ आणि सन २०११ ते २०१६ या कालावधीसाठीचा वेतन करार २८ एप्रिल २०१२ रोजी झाला होता. त्यामुळे यंदाचा वेतनकरार वेळेत करण्याची मागणी युनियनने केली आहे.
राव म्हणाले की, बेस्ट उपक्रमाने २००७ सालापासून यापूर्वीचा करार होईपर्यंत रोजंदारी पद्धतीने व कनिष्ठ श्रेणी निर्माण करून समारे ११ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करताना त्यांची मातृश्रेणी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ७ हजार ९३० करता आली नाही. नव्या कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना केवळ ५ हजार ४३० मातृश्रेणी ठरवण्यात आली. परिणामी, या कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपयांचा फटका बसला. त्यामुळे नव्या वेतन करारात या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी राव यांनी प्रशासनाकडे केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे युनियनने उपक्रमातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १५ हजार ३०० करण्याची मागणी केली आहे. शिवाय बसवाहक व बासचालकांचे किमान मूळ वेतन अनुक्रमे १६ हजार ६०० व १७ हजार २०० रुपये करण्याची मागणी युनियनने प्रस्तावात केली आहे.
प्रस्तावातील अन्य महत्त्वाच्या मागण्या
बेस्ट उपक्रमातील महिला कर्मचाऱ्यांना केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बाल संगोपन रजा मिळावी.
३ लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांपर्यंत गृह कर्जावरील व्याजापोटी भरावयाच्या रकमेसाठी अनुदान देण्यात यावे.
बेस्ट कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ६ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करावी.
पालिकेने निधी द्यावा
जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाव्यवस्थापकांकडून यासंदर्भात चर्चेसाठी बैठक होण्याची शक्यता राव यांनी व्यक्त केली. बेस्ट तोट्यात असल्याचे कारण पुढे करत जर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार असेल, तर मुंबई महानगरपालिकेने पालक म्हणून बेस्टला निधी देण्याची मागणी राव यांनी केली आहे.

Web Title: 40% salary increase for best employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.