राज्यातील ४० साखर कारखाने ED च्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 06:59 AM2021-07-14T06:59:50+5:302021-07-14T07:00:16+5:30
ED On Sugar Mills : ‘ईडी’कडून आर्थिक व्यवहार, अनियमितता तपासली जाणार.
जमीर काझी
मुंबई : राज्यातील ४० सहकारी कारखाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. आर्थिक गैरव्यवहार, बुडीत कर्जे (एनपीए) प्रकरणी त्यांच्या व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकार बँकेतील कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याच्या तपासाप्रकरणी या कारखान्यांना नोटिसा काढण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने चौकशी केली जाणारे बहुतांश कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. हे कारखाने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यातील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ईडीने १२ दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकार कारखान्याची ६५.७५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सुरू केलेल्या चौकशीतून ही कारवाई करण्यात आली आहे. विविध बँकांतून बेकायदेशीर कर्ज उचलून कारखाने तोट्यात आणणे, कर्जाची परतफेड न झाल्याने अवसायनात काढला जाणे, कर्जाहून खूप कमी किमतीत तो खासगी कंपन्या, व्यक्तीकडून खरेदी करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
समन्स बजावून माहिती मागवणार
अवसायनात काढण्यात आलेले बहुतांश साखर कारखाने विकत घेणाऱ्या कंपन्या या राजकीय नेते व त्यांच्या नातेवाईक यांच्या मालकीच्या असल्याचा ईडीचा कयास आहे. त्यामुळे या कारखान्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात या कारखान्यांना समन्स बजावून त्यांच्या आर्थिक व्यवहार, साखरेशिवाय इथेनॉल व अन्य उत्पादने त्यासाठी केलेली गुंतवणूक आदींची माहिती मागविली जाईल.