४० हजार मे. टन तूरडाळीचा बफर स्टॉक
By admin | Published: December 2, 2015 02:28 AM2015-12-02T02:28:10+5:302015-12-02T02:28:10+5:30
फूड कार्पोरेशन आॅफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्रासाठी ४० हजार मेट्रीक टन तूरडाळीचा बफर स्टॉक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठीच्या तूरडाळीची खरेदीही कार्पोरेशनने
मुंबई : फूड कार्पोरेशन आॅफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्रासाठी ४० हजार मेट्रीक टन तूरडाळीचा बफर स्टॉक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठीच्या तूरडाळीची खरेदीही कार्पोरेशनने सुरु केल्याची माहिती अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खरेदी केला जाणारा स्टॉक गरजेनुसार राज्यातल्या बाजारपेठेत आणि रेशन दुकानांच्या माध्यमातून सरकार ठरवेल त्या दराने उपलब्ध करुन दिला जाईल, असेही बापट यांनी यावेळी सांगितले. आमच्या विभागाने रेशन दुकानांच्या माध्यमातून तूरडाळ देण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत ठेवला जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनी तूरीचे पीक घ्यावे यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्याची योजनाही सरकार तयार करत असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, जप्त केलेली तूरडाळ रेशन दुकानांच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्या, अशी मागणी करत नवी मुंबई मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात अचानक दुपारी अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. बापट यांच्या दालनात बैठक सुरू असताना अचानक मनसेचे आठ ते दहा कार्यकर्ते मनसेचे स्कार्फ घालून आले आणि दालनासमोर बसून त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. कोणतेही निवेदन न देताच हे कार्यकर्ते माध्यमांना बाईट देऊन निघून गेले.
जप्त केलेली तूरडाळ गेली कुठे?, साठेबाजी करणाऱ्यांना त्यांची डाळ परत करुन सरकारने साठेबाजी करणाऱ्यांचेच खिसे भरल्याचा आरोप यावेळी हे कार्यकर्ते करत होते. आजही अनेक व्यापाऱ्यांनी तूरडाळीचा साठा करुन ठेवलेला आहे. मात्र त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आणि अधिकाऱ्यांकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष आहे, असेही नवी मुंबई मनसेचे शहराध्यक्ष गजाजन काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)