४० वर्षे जुना पूल कोसळला
By Admin | Published: September 6, 2016 04:17 AM2016-09-06T04:17:52+5:302016-09-06T04:17:52+5:30
सिल्लोड-कन्नड राज्य महामार्ग क्र. ५१वरील मोढावाडीजवळच्या नाल्यावरील ४० वर्षे जुना पूल सोमवारी दुपारी कोसळला.
सिल्लोड (जि. औरंगाबाद) : महाड येथील पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच सिल्लोड-कन्नड राज्य महामार्ग क्र. ५१वरील मोढावाडीजवळच्या नाल्यावरील ४० वर्षे जुना पूल सोमवारी दुपारी कोसळला. पुलासह दोन मोटारसायकली २० फुट खोल नाल्यात कोसळल्या. यात चौघे जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
गोविंदा तुकाराम पंडित (४५) , बाळू आनंदा पंडित (२५), अजयसिंग तुकाराम राजपूत (२५) व आरती भारत बारवाल (२८) अशी जखमींची नावे असून गोविंदा व बाळू हे दोघे गंभीर जखमी आहेत. दुपारी चारच्या सुमारास मोटारसायकलवरून गोविंदा व बाळू हे सिल्लोडहून मोढाकडे येते होते, तर दुसऱ्या मोटारसायकलवरून अजयसिंग राजपूत व आरती बारवाल हे दोघे अन्वा येथे जात होते.
दोन्ही मोटारसायकल पुलावर असतानाच अचानक हा पूल कोसळला.
जवळपास ६० फूट लांबीच्या या पुलाचे भिंतीसदृश्य दोन खांब पाण्याच्या प्रवाहात कमकुवत झाले होते. त्यातील एक खांब सोमवारी कोसळली. यामुळे पुलाचे मधोमध दोन तुकडे झाले. त्यामुळे सिल्लोड, भराडी, कन्नड, चाळीसगाव, धुळे व आसपासच्या ५०पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला. पुलाच्या दोन्ही बाजुकडील वाहतूक दोन तास ठप्प होती. जेसीबीच्या सहाय्याने पर्यायी रस्ता तयार करून मोटारसायकलसह पायी जाणाऱ्यांची सोय करण्यात आली. तसेच जड वाहने मोढा मंगरुळमार्गे रवाना करण्यात आली. (प्रतिनिधी)
>गणेशभक्तांची अडचण
भराडी, बोरगावबाजार, मोढा, वांगी, कोटनांद्रा, घाटनांद्रा तसेच आसपासच्या गावातील गणेशभक्त मूर्ती खरेदीसाठी सिल्लोड येथे आले होते. परंतु घराकडे परत जाताना पूल कोसळल्याने ते सुमारे दोन तास अडकून पडले.
>सिल्लोड -कन्नड राज्य महामार्ग क्र ५१ वरील मोढावाडीजवळील (जि. औरंगाबाद) नाल्यावरील ४० वर्ष जूना पूल सोमवारी (दि.५) दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक कोसळला . नेमके त्याच वेळेस पुलावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकली पुलासह गडगडत खाली जाऊन मोटारसायकलस्वार चौघे जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.