बारामती परिमंडलातील २ लाख ग्राहकांनी भरले ४० कोटी आॅनलाइन वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:25 PM2017-10-11T15:25:50+5:302017-10-11T19:01:04+5:30
महावितरणच्या बारामती परिमंडलातील पावणेदोन लाखांहून अधिक ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ४० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाईन भरणा केला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : महावितरणच्या बारामती परिमंडलातील पावणेदोन लाखांहून अधिक ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ४० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाईन भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिले आॅनलाईन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे.
महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर आॅनलाईन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश काडर््सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ?ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
सप्टेंबर महिन्यात बारामती परिमंडलात एक लाख ७८ हजार १६५ ग्राहकांनी ४० कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजबिलांचे आॅनलाईन पेमेंट केले आहे. यात बारामती मंडलातील ३१ हजार २४७ ग्राहकांनी ९ कोटी ७९ लाख, सातारा मंडलातील एक लाख २ हजार ८५१ ग्राहकांनी ११ कोटी ४५ लाख तर सोलापूर मंडलातील ४४ हजार ६७ ग्राहकांनी १९ कोटी ३३ लाख रुपयांचा आॅनलाईन वीजबिल भरणा केला आहे. या माध्यमातून ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरण्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसत आहे. आता इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालल्याने बिल भरणा केंद्रांसमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे.
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी 'गो-ग्रीन' संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल आॅनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.