दरमहा ४०० नवजातांचे मृत्यू
By Admin | Published: November 24, 2015 02:29 AM2015-11-24T02:29:36+5:302015-11-24T02:29:36+5:30
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
मुंबई : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून हे सत्य समोर आले आहे.
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने यंदा प्रसिद्ध केलेल्या अहवालात, २००८ ते २०१२ पर्यंतची आकडेवारी दिली आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत ३२ हजार ६६४ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. संसर्ग, न्यूमोनिया, अतिसार, तापाचे विकार आणि श्वसनविकारामुळे मुंबई शहरातील बालकांचे मृत्यू होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. नवजात शिशुंची योग्य ती निगा राखल्यास, ५० ते ६० टक्के अर्भकांचा मृत्यू टाळता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
देशात दररोज तीन हजार बालके कुपोषणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या संदर्भात जागृती करण्यासठी ‘नवजात बालक काळजी सप्ताह’ मुंबईतील रुग्णालयांमध्ये राबवण्यात आला.
नवजात बाळाची काळजी जन्मापासून ते २८ दिवसांपर्यंत घ्यायची असते. या काळातली निगा ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण याच दिवसांत नवजात बालकांना जंतू संसर्गाची जास्त शक्यता असते. गर्भधारणा झाल्यापासून बालकाला
जन्म देईपर्यंतचा काळ अतिशय काळजीचा असतो. त्याचसोबत व अधिक महत्त्वाचा काळ जन्मलेल्या नवजात बाळाच्या संगोपनाचा असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत विधीवत शिक्षण घेणे अमेरिकेसारख्या देशात सक्तीचे करण्यात आलेले आहे. आपल्याकडे मात्र जन्म देणाऱ्या मातेची ती जबाबदारी आहे, असेच मानले जाते. -डॉ. समीर शेख, नवजात अतिदक्षता
विभाग प्रमुख व नवजात शिशुतज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय