वर्षभरात महाराष्ट्रातील ४१ कैद्यांचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 01:43 AM2020-10-06T01:43:25+5:302020-10-06T01:43:36+5:30
एनसीआरबीच्या अहवालानुसार, संपूर्ण राज्यात १३५० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता ४ लाख ३ हजार ७३९ कैद्यांची असताना गेल्या वर्षभरात ४ लाख ७८ हजार ६०० कैद्यांना कोंबण्यात आले.
मुंबई : कारागृहात सर्वाधिक मृत्यू आजारपणामुळे झाले असून यात, हृदयविकाराने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून समोर आले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील ४१ कैद्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, संपूर्ण राज्यात १३५० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता ४ लाख ३ हजार ७३९ कैद्यांची असताना गेल्या वर्षभरात ४ लाख ७८ हजार ६०० कैद्यांना कोंबण्यात आले. महाराष्ट्रातील ९ मध्यवर्ती, २८ जिल्हा कारागृहांसह एकूण ६४ कारागृहांचा यात समावेश आहे. यात पुरुष २२,८३० आणि महिला १,२६५ अशी एकूण २४ हजार ९५ कैद्यांची क्षमता असताना, ३६ हजार ७९८ कैदी या कारागृहांत आहेत. गेल्या वर्षभरात या कारागृहांत १३२ कैद्यांचा मृत्यू झाला. यात १२१ कैद्यांचा नैसर्गिक तर ११ जणांचा अनैसर्गिकरीत्या मृत्यू झाला आहे. यात, हृदयविकाराने ४१ कैद्यांचा मृत्यू झाला.
३९ कैदी पसार
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून सर्वाधिक ३९ कैदी (न्यायालयीन कोठडीत असलेले) पसार झाले होते. यात कारागृहातून १३, कारागृहाबाहेरून ९ तर पोलीस कोठडीतून १७ जण पसार झाले आहेत.