४२ कृषिसेवा केंद्रांमध्ये आढळले संशयास्पद बियाणे!
By admin | Published: June 9, 2016 01:54 AM2016-06-09T01:54:54+5:302016-06-09T02:38:16+5:30
विक्री बंद करण्याचे आदेश; दक्षता पथकाची कारवाई.
गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा)
कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी असलेल्या गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथकाने जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांमध्ये केलेल्या तपासणीत ४२ ठिकाणी विशिष्ट लॉट नंबरचे संशयास्पद बियाणे आढळले आहेत. त्यामुळे संबंधित बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश या कृषिसेवा केंद्रांना देण्यात आले आहेत.
खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू होताच बी-बियाणे, रासायनिक खतांचा काळाबाजार करणर्यांचे टोळकेही सक्रिय होते. प्रमाणित व नामांकित बियाण्याच्या नावावर बनावट बियाणे आणि रासायनिक खतांची शेतकर्यांना विक्र ी केली जाते. त्यामुळे बियाणे-खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावर एक गुणवत्ता नियंत्रण पथक नेमण्यात येते. बुलडाणा जिल्ह्यात तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे १३ आणि जिल्हास्तरावर एक अशी एकूण १४ दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी केलेल्या तपासणीत ४२ कृषिसेवा केंद्रांमध्ये विशिष्ट लॉट नंबरचे संशयास्पद बियाणे आढळून आले आहेत. त्यामुळे त्या कृषिसेवा केंद्रांना संबंधित बियाण्याची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
असे आहे दक्षता पथक
तालुकास्तरीय पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी पथकप्रमुख आहेत, तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय पथकामध्ये पथकप्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी, तर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, सहायक नियंत्रक वैध मापनशास्त्र आणि जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी हे सदस्य आहेत.
कारवाई झालेले कृषीसेवा केंद्र
तालुका कृषिसेवा केंद्रे
बुलडाणा 0१
चिखली १0
देऊळगावराजा 0४
खामगाव 0४
शेगाव 0५
संग्रामपूर १0
नांदुरा 0१
मलकापूर 0७
एकू ण ४२