42 बढत्या रखडल्या , पाच जिल्ह्यांतील स्थिती; पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यवाहीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:25 AM2018-01-22T03:25:44+5:302018-01-22T03:25:55+5:30
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील क्लास २मध्ये बढतीसाठी पात्र असलेले ४२ कर्मचारी-अधिकारी पदाच्या प्रतीक्षेत आहेत. वस्तुत: राज्य शासनाने ‘क’ वर्ग कर्मचा-यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार ‘क्लास’ वर्गात बढत्या करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र पुणे विभागीय स्तरावर फायली धूळ खात पडल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे.
अभिजित कोळपे
पुणे : सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील क्लास २मध्ये बढतीसाठी पात्र असलेले ४२ कर्मचारी-अधिकारी पदाच्या प्रतीक्षेत आहेत. वस्तुत: राज्य शासनाने ‘क’ वर्ग कर्मचा-यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार ‘क्लास’ वर्गात बढत्या करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र पुणे विभागीय स्तरावर फायली धूळ खात पडल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, आरोग्य, कृषी, बांधकाम (उत्तर व दक्षिण), वित्त, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महिला बालकल्याण आणि समाज कल्याण तसेच १३ तालुक्यांतील पंचायत समिती स्तरावर म्हणजे कक्ष अधिकारी (लिपिक), कृषी अधिकारी आणि विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या संवर्गात काम करणारे एकूण ९ कर्मचारी क्लास २ च्या वर्गात बढतीसाठी पात्र आहेत.
यातील काही जण सेवाज्येष्ठतेनुसार, तर काही जण सरळ सेवेतून पात्र आहेत. त्यामुळे या सर्वांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेतील ९ आणि सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील ३३ असे एकूण ४२ कर्मचारी विभागीय आयुक्तांच्या कार्यवाहीची वाट पाहत आहेत.
तपासणी करून कार्यवाही-
या पाच जिल्ह्यांतील विविध विभागांतील ‘क’ वर्गातील ४२ कर्मचाºयांची यादी आमच्याकडे आली आहे. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्वांच्या तत्काळ बढत्या करण्यात येणार असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.