एसटीत आणखी ४३ समुपदेशक
By admin | Published: October 24, 2014 04:19 AM2014-10-24T04:19:25+5:302014-10-24T04:19:25+5:30
पुण्यातील चालक संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाकडून चालकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली होती.
मुंबई : पुण्यातील चालक संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाकडून चालकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली होती. आता या समुपदेशकांची संख्या आणखी वाढवण्यात येणार असून ४३ समुपदेशकांची लवकरच नेमणूक केली जाणार आहे.
२0१२ मध्ये पुण्यातील स्वारगेटमध्ये चालक असलेला संतोष माने याने आगारातील बस पळवून त्यानंतर रस्त्यावर घातलेल्या धुमाकुळात ९ जण ठार आणि २७ जण जखमी झाले होते. मात्र या प्रकरणानंतर चालकांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर येताच एसटीकडून समुपदेशक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या एसटी महामंडळाकडे राज्यात २१ समुपदेशक कार्यरत आहेत. परंतु एसटी गाड्यांचे होणारे अपघात तसेच बस चालवताना काही प्रमाणात चालकांची ठीक नसणारी मानसिक स्थिती पाहता महामंडळाकडून यावर काही उपाययोजना केल्या जात आहेत. चालकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले असून या वर्ष0अखेरपर्यंत पाच हजार चालकांचे आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)