स्वाइन फ्लूचे राज्यात ४३ बळी
By Admin | Published: February 13, 2015 01:52 AM2015-02-13T01:52:55+5:302015-02-13T01:52:55+5:30
महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २९६ असून आतापर्यंत ४३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
मुंबई : महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २९६ असून आतापर्यंत ४३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. शेजारच्या गुजरात राज्यामध्ये स्वाईन फ्लूची लागण मोेठ्या प्रमाणावर झाली असून त्यांना महाराष्ट्रातून औषधे पुरवण्यात येत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
डॉ. सावंत म्हणाले की, स्वाईन फ्ल्यूची साथ महाराष्ट्रात शेजारच्या गुजरातच्या तुलनेत आटोक्यात आहे. बुधवारपर्यंत या साथीने मरण पावणाऱ्यांची संख्या ४० होती. बुधवारी रात्री तीनजण मरण पावल्याने आता मृतांची संख्या ४३ झाली आहे. गुजरातने केलेल्या मागणीनुसार स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांवर उपचार करण्याकरिता २५०० कॅप्सुल्सचा साठा धाडण्यात आला आहे. तेवढ्याच कॅप्सूल्स परत करण्याच्या बोलीवर ही मदत केलेली असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
मुंबईत नवे १० रुग्ण
मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे ९० रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी ५७ रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर, ३३ रुग्ण हे मुंबई बाहेरून मुंबईत उपचारांसाठी आले आहेत. गुरूवारी, १२ फेब्रुवारी रोजी भोपाळवरून स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी आलेल्या एका ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मुंबई बाहेरून उपचारासांठी आलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता ७ वर पोहचला आहे. भोपाळ येथील एका महिलेचा गुरूवारी मुंबईत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. २५ जानेवारी रोजी या महिलेला अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
गुरूवार, १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत स्वाईनचे नवे १० रुग्ण आढळून आले आहेत. यात ५ महिला रुग्णांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी नवीन रुग्णांपैकी सातजणांना रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबई बाहेरून ४ रुग्ण उपचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी तीन लहान मुले आहेत. ठाणे येथील ४ वर्षीय मुलला, ५ वर्षीय मुलीला आणि १५ वर्षीय मुलीला स्वाइनची लागण झाली आहे. १५ वर्षीय मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. इतर दोन मुलांना बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. कल्याणच्या ४९ वर्षीय महिलेला पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)