शहरात मीटर नसलेले ४३०० नळजोड
By admin | Published: May 14, 2014 05:56 AM2014-05-14T05:56:07+5:302014-05-14T05:56:07+5:30
शहरात ४३०० नळजोडांना मीटर नाहीत. महापालिकेने वेळोवेळी आवाहन करूनही अधिकृत मीटर बसवून न घेता, बेहिशेबी पाणी वापर होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
पिंपरी : शहरात ४३०० नळजोडांना मीटर नाहीत. महापालिकेने वेळोवेळी आवाहन करूनही अधिकृत मीटर बसवून न घेता, बेहिशेबी पाणी वापर होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या मीटर नसलेल्या रहिवाशांच्या यादीत काही लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी अशा बड्या मंडळींच्या नावांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांना नळाला मीटर लावण्यास भाग पाडले जात असताना, बड्या मंडळींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे. नळजोडाला मीटर नसलेले ४ हजार २०० रहिवासी असून, त्यामध्ये ९४ व्यावसायिकांचा यामध्ये समावेश आहे. महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत २४ तास पाणीपुरवठा योजनेची आखणी केली. त्यानुसार मीटर पद्धतीचा अवलंब करण्याचे धोरण आखले. महापालिकेने स्वत: मीटर बसविण्याचे काम हाती घेतले. महापालिका हद्दीतील एकूण १ लाख ३९ हजारपैकी ६५०० नळजोड झोपडपट्टीत आहेत. आतापर्यंत १ लाख २३ हजार नळजोडांना मीटर बसवले आहेत. उर्वरित मीटर बसविण्यास महापालिकेने आखडता हात घेतला. नागरिकांनी स्वखर्चाने मीटर बसवावेत, असे आवाहन केले. ज्यांनी अनधिकृत नळजोड घेतले आहेत, त्यांनी मीटर बसवून घ्यावेत. अनधिकृत नळजोड नियमित करून घ्यावेत अन्यथा महापालिका कठोर कारवाई करेल, असा इशारा देण्यात आला. सर्वसामान्यांनी कारवाईच्या भीतीने नळाला मीटर बसवून घेतले. अनेक धनदांडग्यांनी मात्र अद्यापही मीटर बसवले नसल्याचे मीटर न बसविलेल्यांच्या लांबलचक यादीतून स्पष्ट झाले आहे. पाणी उपशासाठी विद्युत मोटर पाणी किती वापरले याच्या ‘रीडिंग’साठी मीटर नाही, पण पाणी उपसा करण्यासाठी नळाला विद्युत मोटारी लावून पाणी उपसा करण्याचे प्रमाण अधिक आहे. महापालिकेकडे नोंद न करता अनधिकृत नळ जोडद्वारे, फुकट अमर्याद पाणी वापरणारे दुर्लक्षित रहातात. विद्युत मोटारी लावून पाणी उपसा करणार्यांवर ठोस कारवाईस अधिकारी धजावत नाहीत. परिणामी पाणी वितरण व्यवस्थेत त्रुटी कायम राहते, शिवाय पाणीपट्टी वसुली होत नसल्याचे उघड झाले आहे. विद्युत मोटारीने पाणी उपसा करणार्यांवर कारवाई नाही. सामान्यांना मात्र काटकसरीने पाणी वापरण्याचे बंधनकारक केले जाते. मनपाचे हे धोरण अन्यायकारक आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (प्रतिनिधी)