पालखी मार्ग प्रकाशमय करण्यासाठी ४३९ कर्मचारी, ५५ अधिकारी रात्रंदिवस करू लागले काम
By Appasaheb.patil | Published: June 26, 2019 08:09 PM2019-06-26T20:09:50+5:302019-06-26T20:14:50+5:30
महावितरण: आषाढीच्या पार्श्वभूमीवर मेंटेनन्सची कामे पूर्ण, अतिरिक्त १३ रोहित्र बसविले
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पंढरपुरात होणाºया आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाकडून विविध सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत जिल्ह्यातील पालखी मार्गावर २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी १३ अतिरिक्त रोहित्र बसविण्यात आली आहेत़ शिवाय पालखी मार्ग प्रकाशमय करण्यासाठी ४३९ कर्मचारी, ५५ अधिकारी, उपअभियंते, शाखा अभियंते, जनमित्रांसह खासगी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालखी तळावर ग्रामपंचायत व देवस्थान प्रमुखांनी संबंधित अधिकाºयांकडे वीजजोडणीसाठी अर्ज केल्यास महावितरणकडून एका मिनिटात वीजजोडणी देण्याची यंत्रणा तयार करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पंढरपुरात होणाºया आषाढी वारीसाठी देहू, आळंदीहून निघालेला संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी धर्मपुरी येथून जिल्ह्यात प्रवेश करून नातेपुते येथे मुक्कामी थांबणार आहे़ शिवाय श्री संत तुकाराम महाराजांची पालखी ७ जुलै रोजी अकलूज येथे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपूरकडे येते. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज, श्रीपूर, बोरगाव, तोंडले-बोंडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपुरात येते़ या दोन्ही पालखी मार्गावर प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महावितरणकडून यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
वीजवितरणच्या कामात सुसुत्रता येण्यासाठी काही खासगी कर्मचाºयांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
पालखी तळावर एका मिनिटात वीजजोडणी
- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू-आळंदी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे़ दोन्ही सोहळे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी मार्गावर नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी एकूण १० पालखी तळ आहेत़ या पालखी तळावर ग्रामपंचायत कार्यालय अथवा तेथील देवस्थानकडून पालखीतील लोकांना वीजपुरवठा केला जातो़ ज्या ग्रामपंचायतीकडे वीजजोडणी नाही अशा ग्रामपंचायत अथवा देवस्थान व वैयक्तिक ग्राहकाने महावितरणच्या संबंधित अधिकाºयाकडे अर्ज केल्यास एका मिनिटात वीजजोडणी देण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे़
ट्रान्सफॉर्मर व लोखंडी पाईपला घातले आवरण
- पंढरपुरात येणाºया भाविकांना विजेचा धक्का लागू नये अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महावितरणकडून पंढरपूर शहर व पालखी मार्गावरील प्रत्येक ट्रान्सफॉर्मर व लोखंडी पाईपला पीव्हीसी पाईपचे आवरण घालण्यात आले आहे़ आवरण घालण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून १ जुलै अखेर पूर्णपणे काम होईल, अशी माहिती महावितरणने दिली़
२४ तास अधिकारी, कर्मचारी अलर्ट असणार
- पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणाºया भाविकांना सुरक्षित वारीचा अनुभव व्हावा, यासाठी महावितरणचे ५५ अधिकारी व ४३९ कर्मचारी, जनमित्र, वायरमन २४ तास सेवा बजावणार आहेत़ कोणत्याही भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीज सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत़ याकामी पंढरपुरात येणाºया भाविकांनी महावितरणच्या प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे़
पंढरपूर शहर व पालखी मार्गावरील लोंबकळणाºया तारा, ताराला स्पर्श होणाºया झाडांच्या फांद्या आदी मेंटेनन्सची कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे़ आषाढी वारीकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही अलर्ट राहणे काळाची गरज आहे.
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर.