राज्यात दोन महिन्यांत ४४१ बालमृत्यू
By Admin | Published: July 16, 2016 01:15 AM2016-07-16T01:15:53+5:302016-07-16T01:15:53+5:30
आरोग्याच्या असंख्य योजना आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण मात्र खूप मोठे असल्याचे राज्य कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले
पुणे : आरोग्याच्या असंख्य योजना आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण मात्र खूप मोठे असल्याचे राज्य कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ही संख्या थोडीथोडकी नसून दोन महिन्यांत राज्यात विविध कारणांनी ४४१ बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आदिवासी भागातील जनतेच्या आरोग्यात सुधारणा करण्याच्या हेतूने राज्यभरात नवसंजीवनी योजना राबविण्यात येते. यामध्ये आदिवासी जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरविणे, पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, अन्नधान्यपुरवठा निश्चित करून योग्य आहार देणे, कुपोषित बालकांवर वेळीच योग्य ते उपचार करणे अशा प्रकारच्या सुविधा राज्य शासनाकडून पुरविल्या जातात.
गरोदर माता व अर्भकमृत्यू कमी करणे हा या योजनेमागील मूळ उद्देश असून तो साध्य होत नसल्याचेच उघडपणे समोर येत आहे. यामध्येही ० ते १ वर्षे वयोगटातील ३५० बालकांचा, तर १ ते ६ वर्षे वयोगटातील ९१ बालकांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार येथे सवार्धिक म्हणजे एप्रिल व मे या केवळ दोन महिन्यांत ८४ बालके मृत्युमुखी पडली असून सर्वात कमी म्हणजे ३ बालमृत्यू हे जळगाव येथे झाले आहेत.
महाराष्ट्र राज्याचा बालमृत्यूदर दर हजारी जन्मदरामागे २४ इतका असून इतर राज्यांच्या तुलनेत हा कमी असल्याचे कुटुंब कल्याण विभागाकडून सांगण्यात आले. मात्र मागील जवळपास २० वर्षांपासून चालविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत एकूण १६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येते. यामध्ये १०३ ग्रामीण रुग्णालये, ४११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २३२२ उपकेंद्रे व १३६८१ अंगणवाड्यांमध्ये योजनेमधील विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.