...अन् ४५ मिनिटांनी धडधडले हृदय, प्रत्यारोपणाआधीच ठोके झाले सुरू
By Admin | Published: April 20, 2016 05:35 AM2016-04-20T05:35:11+5:302016-04-20T05:35:11+5:30
डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ आजाराने ग्रस्त असलेल्या गुजरातच्या जयसुखभाई ठाकेर (३८) यांना चेन्नईला हृदयप्रत्यारोपणासाठी नेण्यात आले होते
मुंबई : ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ आजाराने ग्रस्त असलेल्या गुजरातच्या जयसुखभाई ठाकेर (३८) यांना चेन्नईला हृदयप्रत्यारोपणासाठी नेण्यात आले होते, पण हृदयप्रत्यारोपणाआधीच १३ जानेवारीला त्यांना ‘कार्डिएक अरेस्ट’ (हृदय बंद पडणे) आला. त्यानंतर, तब्बल ४५ मिनिटे त्यांच्या हृदयाचे ठोके बंद होते. कार्डिओपल्मनरी रेस्युसायटेशन (सीपीआर) प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात आली. पुन्हा-पुन्हा ही प्रक्रिया वापरून तब्बल ४५ मिनिटांनी हृदयाचे ठोके पुन्हा सुरू करण्यात डॉक्टरांना यश आले. त्यामुळे जयसुखभार्इंना जीवनदान मिळाले असून, त्यांची आता प्रकृती स्थिर आहे. येत्या काहीच दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
जयसुखभाई यांचा हृदयविकार शेवटच्या टप्प्यावर असल्याने हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे जयसुखभार्इंना गुजरातहून चेन्नईच्या फोर्टिस मलार रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू करून प्रकृती स्थिर करण्यात आली. त्याच दरम्यान, त्यांना कार्डिएक अरेस्ट आल्यामुळे त्यांचे हृदयाचे ठोके बंद पडले. कार्डिएक अरेस्ट आल्यानंतर डॉक्टरांनी हृदयाचे ठोके सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के.आर. बालकृष्णन यांच्या चमूने जयसुखलालभाई यांना ‘एक्स्ट्राकॉर्पाेरल मेंब्रेन आॅक्सिजिनेशन (इसीएमओ) मशीन’वर ठेवले. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसाचे कार्य सुरू राहण्यास मदत झाली, तर दुसरीकडे त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यात आले. या ‘कुलिंग प्रोजिसर’मुळे रुग्णाचा मेंदू कार्डिएक अरेस्टच्या काळात सुरक्षित राहण्यास मदत झाली, असेही डॉ. बालकृष्णन यांनी सांगितले. तब्बल ४५ मिनिटांनी त्यांच्या हृदयाची धडधड पुन्हा सुरू झाली आणि जवळपास मृतावस्थेत गेलेल्या जयसुखभार्इंना जीवनदान मिळाले. तब्बल १० दिवस ते कोमामध्ये होते, नंतर ते शुद्धित आले. त्यानंतरही काही दिवस त्यांना ‘आर्टिफिशिअल हार्टपंप’चा आधार देण्यात आला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. २९ जानेवारी रोजी त्यांना हृदयदाता मिळाल्यावर त्यांचे हृदयप्रत्यारोपण करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली
असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)