मुंबईत दहीहंडीच्या थरारात 117 गोविंदा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 06:37 PM2017-08-15T18:37:18+5:302017-08-15T21:12:08+5:30
मुंबईमध्ये आज सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येत आहे. मात्र या थरारामध्ये उंचच उंच थर रचण्याच्या नादात अनेक गोविंदा जखमी होत आहेत.
मुंबई, दि. 15 - मुंबईमध्ये आज सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येत आहे. मात्र या थरारामध्ये उंचच उंच थर रचण्याच्या नादात अनेक गोविंदा जखमी होत आहेत. आज सकाळपासून दहीहंडीच्या थरथराटात सुमारे 117 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन गोविंदाला जबर मार लागला असून, त्यांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
गोविंदा रे गोपाळा म्हणत आज सकाळपासूनच मुंबईतील गोविंदांनी दहीहंड्या फोडण्यास सुरुवात केली होती. मात्र यादरम्यान काही गोविंदांना दुखापतींनाही सामोरे जावे लागले. संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 117 गोविंदा जखमी झाले आहेत. संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील नायर रुग्णालयात 12, केईएम रुग्णालयात 21, सायन येथील रुग्णालयात 15, सेंट जॉर्ज रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 1, जेजे रुग्णालयात 1 माहात्मा फुले रुग्णालय, विक्रोळी येथे 1, मुलुंडच्या आग्रवाल रुग्णालयात 4, व्ही. एन. देसाई रुग्णालयात 5, कूपर रुग्णालयात7, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे 4, ट्रॉमा केअर गोरेगाव येथे 3 आणि इतर अशा एकूण 117 गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केईएम, नायर आणि सिद्धार्थ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार सुरू आहेत.
ऐरोली येथे शॉक लागून गोविंदाचा मृत्यू
नवी मुंबईतील ऐरोली येथे शॉक लागून गोविंदाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या दहीहंडीमध्ये हा अपघात घडला. जयेश सरले (३०) असे मयत गोविंदाचे नाव आहे. चुनाभट्टी येथील प्रेमनगर गोविंदा पथकाचा तो गोविंदा होता. याप्रकरणी आयोजकांवर गन्हा दाखल केला जानार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसर रबाळे पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवसेना ज़िल्हा प्रमुख विजय चौगुले या दहीहंडीचे आयोजक आहेत.
यंदा स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने, चाकरमानी मुंबईकरांना थरांचे स्वातंत्र्य अनुभवायला मिळत आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना, गोविंदांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेला दहीहंडी उत्सव, यंदा जोश-जल्लोषात साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. मागील काही वर्षांत न्यायालयीन निर्बंधांमुळे संभ्रमावस्थेत असलेल्या उत्सवावर भीतीचे सावट दिसून आले. मात्र, यंदा गोविंदा पथके सर्व निर्बंध झुगारून ‘करून दाखविणारच’ या निर्धाराने मैदानात उतरताना दिसत आहेत. उच्च न्यायालयाने बालगोविंदाचे वय कमी करून १८ वरून १४ केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे पालन गोविंदा पथके करणार, याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.
पोलिसांचे सुरक्षा कवच :
मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान, शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात आहेत. केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दल तैनात असून अतिरेकी कारवायांच्या शक्यतेतून गुप्तचर तपास यंत्रणाकार्यरत असतील, असे कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सहायुक्त देवेन भारती यांनी सांगितले होते. ड्रोनसह ५ हजार सीसीटीव्हींचा वॉच आहे.