अपघाती मृत्यूबद्दल ४६ लाखांची भरपाई
By admin | Published: November 5, 2015 01:00 AM2015-11-05T01:00:12+5:302015-11-05T01:00:12+5:30
सहा वर्षांपूर्वी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका विवाहित महिलेच्या पती व दोन मुलांना ४६. ६१ लाख रुपये भरपाई
मुंबई : सहा वर्षांपूर्वी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका विवाहित महिलेच्या पती व दोन मुलांना ४६. ६१ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
सांगली येथील मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने या अपघातग्रस्त कुटुंबास ४९ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश गेल्या वर्षी मे महिन्यात दिला होता. त्याविरुद्ध न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने केलेले अपील न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने फेटाळले. खंडपीठाने न्यायाधिकरणाच्या निकालात थोडा बदल करून भरपाईची रक्कम ४९ ऐवजी ४६. ६१ लाख रुपये
केली. तसेच त्यावर दावा दाखल केल्यापासून म्हणजे २००९ पासून सहाऐवजी सात टक्के दराने व्याज देण्याचा आदेश दिला. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीस असलेल्या ४४ वर्षांच्या उज्ज्वला गरुड यांचे ३ जानेवारी २००९ रोजी अपघाती निधन झाले होते.
एका बैठकीसाठी मुंबईत आलेल्या उज्ज्वला भाड्याच्या स्कॉर्पिओ गाडीने घरी परत चालल्या होत्या. ती गाडी इस्लामपूर येथील रघुनाथ ज्ञानू खांबे यांच्या मालकीची होती व इम्तियाज लुकमान मणेर ती चालवीत होता. मुंबई-पुणे महामार्गावरून भरधाव वेगाने जात असता रावेत फाट्याजवळ इम्तियाजचा गाडीवरीलताबा सुटला व ती पलटी झाली. अपघातात उज्ज्वला यांचे जागीच निधन झाले.
या अपघाताबद्दल उज्ज्वलाचे पती सुनील परशुराम गरुड व सुमित (२५) व संकेत (२२) या दोन मुलांनी केलेला दावा मंजूर करून सांगलीच्या न्यायाधिकरणाने ४९ लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. त्याविरुद्ध अपगातग्रस्त वाहनाचा विमा ज्यांनी उतरविला होता त्या विमा कंपनीने अपील केले होते.
आता उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या ४६.६१ लाख रुपये भरपाईवर गरुड कुटुंबास २००९ पासूनचे व्याज मिळेल. ही रक्कम पतीला २० टक्के व दोन्ही मुलांना प्रत्येकी ४० टक्के अशी वाटून दिली जाईल. दोन्ही मुलांना मिळणाऱ्या भरपाईपैकी प्रत्येकी १० लाख रुपये त्यांच्या नावे पाच वर्षांसाठी बँकेत मुदत ठेवीत ठेवले जातील. भरपाई गाडीमालक, चालक व विमा कंपनी यांनी मिळून द्यायची आहे. (विशेष प्रतिनिधी)
विमा कंपनीचे मुद्दे फेटाळले
मयत उज्ज्वला यांना ६ व्या वेतन आयोगानुसार भविष्यात किती पगार मिळू शकला असता हे गृहित धरून भरर्पाईचा हिशेब करणे चुकीचे आहे. उज्ज्वला खासगी शिक्षण संस्थेत नोकरला होत्या व त्यांची नोकरीही कायम नव्हती. त्यामुळे ६ व्या वेतन आयोगाचा पगार गृहित धरता येत नाही. शिवाय ही संस्था पुढील इतकी वर्षे सुरु राहिलीच असती याचीही खात्री नाही. परंतु उज्ज्वला यांचा पगार व नोकरीचे स्वरूप याविषयी ठोस पुरावे दिले गेले आहेत. शिवाय खासगी संस्था वेतन आयोगानुसार कधीच पगार देत नाहीत, असे नाही.
मोटार बेदरकारपणे सूसाट वेगाने चालविली गेली. त्यामुळे आम्ही जबाबदार नाही. पण यास काही पुरावा नाही. ड्रायव्हरची साक्ष काढणे शक्य होते, पण तसे केले गेले नाही.