४६ वर्षांनंतर ते पुन्हा लागले नांदू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:48 AM2017-08-08T02:48:43+5:302017-08-08T02:49:02+5:30
४६ वर्षांपूर्वी जेजुरीतील एका दाम्पत्याने किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घटस्फोट घेतला होता. काही कारणाने ते पुन्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांच्या यशस्वी समुपदेशनानंतर तब्बल ४६ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : ४६ वर्षांपूर्वी जेजुरीतील एका दाम्पत्याने किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घटस्फोट घेतला होता. काही कारणाने ते पुन्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांच्या यशस्वी समुपदेशनानंतर तब्बल ४६ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आले.
जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी त्यांचे समुपदेशन केले. जेजुरी येथील दामोदर दोडके हे पोलीस खात्यात नोकरी करीत असताना १९६३मध्ये त्यांचे शालन यांच्याशी विवाह झाला. पुढे त्यांना बाळकृष्ण व शोभा ही दोन मुले झाली. लग्नानंतर आठ वर्षांतच नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरून भांडणांना सुरुवात झाली आणि ते वेगळे राहू लागले. १९८३मध्ये घटस्फोट घेतला.
घटस्फोट झाल्यानंतर दामोदर दोडके यानी दुसरे लग्न केले; मात्र दुसरी बायकोचे निधन झाल्याने पुन्हा ते जेजुरीत नातेवाइकांकडे एकटे राहू लागले. तर त्यांची पहिली पत्नी पुण्यात एका नातेवाइकांकडे राहत होत्या. आता दामोदर दोडके यांचे वय ७९ तर शालन दोडके यांचे वय ७६ आहे. तब्बल ४६ वर्षे हे दाम्पत्य वेगळे राहत होते. वाकोडे यांनी समजावल्यानंतर शालन, तसेच मुलगा, सून, मुलगी हे सर्व एकत्रित आले. ४६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येऊन संसार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आता आयुष्यभर पत्नीचा चांगला सांभाळ करेन, असे दामोदर दोडके यांनी सांगितले. तर, मीही नवºयाची काळजी घेईन, असे शालन दोडके यांनी सांगितले.