नगरात ४७ लाखांचा घोटाळा दडपला
By admin | Published: August 27, 2016 04:55 AM2016-08-27T04:55:53+5:302016-08-27T04:55:53+5:30
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील ४७ लाख रुपयांचा घोटाळा तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दडपल्याचे उघडकीस आले आहे.
मिलिंदकुमार साळवे,
अहमदनगर- येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील ४७ लाख रुपयांचा घोटाळा तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दडपल्याचे उघडकीस आले आहे. बँकेच्या सभासदांना घोटाळ्याची खबरही लागू देण्यात आली नाही. विशेष म्हणजे बँकेच्या प्रशासनाने घोटाळ्याची फिर्यादही पोलिसात दिली नाही. घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करणारा चौकशी अहवाल ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. बँकेच्या कोपरगाव शाखेत ३ आॅक्टोबर २०१५ रोजी ४७ लाख ८ हजार ४८९ रुपयांचा अपहार झाल्याचे बँकेच्या अंतर्गत तपासणीत आढळून आले आहे. ३१ मार्च २०१६ अखेर २०१५-१६च्या आर्थिक कामकाजाची अंतर्गत तपासणी करण्यात आली. बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक यांनी पुरविलेले दप्तर, माहिती व दिलेल्या तोंडी खुलाशातून हा घोटाळा उघडकीस आला आहे. २०१५-१६च्या तपासणीत प्राथमिक शिक्षक बँकेच्या कोपरगाव येथील शाखेत ४७ लाख ८ हजार ४८९ रुपयांचा अपहार बँकेच्या अंतर्गत तपासणीत आढळला. कोपरगाव शाखेचे कॅशिअर संजय सोनवणे यांनीच हा घोटाळा केला . बँकेचे प्राधिकृत चौकशी अधिकारी एन. बी. लहारे यांच्या चौकशी अहवाल निष्कर्षानुसार अपहार सिद्ध झाला आहे.
>पैसे भरल्याने फिर्याद दिली नाही
कोपरगाव शाखेतील अपहार उघडकीस आल्यानंतर कॅशिअरला बडतर्फ करण्यात आले आहे. त्याने अपहाराची रक्कम बँकेत भरली आहे. पोलिसात फिर्याद दिल्यास ठेवीदारांमध्ये उलटसुलट चर्चा होण्याची शक्यता असल्याने व बँकेच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी पोलिसात फिर्याद दिली नाही.
- अरुण देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षक बँक