४७ मपोसे अधिकाऱ्यांची विवरणपत्रे प्रलंबित
By admin | Published: April 4, 2017 06:01 AM2017-04-04T06:01:54+5:302017-04-04T06:01:54+5:30
महाराष्ट्र पोलीस सेवेतील उपायुक्त, अधीक्षक, अपर अधीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षातील विवरणपत्रे अद्याप सादर केलेली नाही.
जमीर काझी,
मुंबई- महाराष्ट्र पोलीस सेवेतील उपायुक्त, अधीक्षक, अपर अधीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षातील विवरणपत्रे अद्याप सादर केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या मालमत्तेत किती वाढ अथवा घट झाली, याची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही.
या ४७ अधिकाऱ्यांना ७ दिवसांमध्ये मालमत्ता व दायित्वाची विवरणपत्र विहित नमून्यात सादर करावयाची आहेत, अन्यथा त्यांच्यावर संबंधित घटकप्रमुखांनी शिस्तभंगविषयक कारवाई करावी, अशी सूचना पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केली आहे.
प्रत्येक शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रतिवर्षी आर्थिक वर्षाअखेरपर्यंतची त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आणि दायित्वाबाबतची माहिती देण्याचे बंधन आहे. प्रत्येक वर्षाच्या ३१ मेपर्यंत त्याबाबतचा तपशील विहित नमुन्यामध्ये कार्यरत असलेल्या विभागाच्या प्रमुखामार्फत शासनाकडे सादर करावयाचा असतो. मात्र, मपोसे असलेल्या ४७ अधिकाऱ्यांनी त्याबाबत सूचना देऊनही, आपली संपत्ती व कर्जाबद्दलचा तपशील जमा केलेला नाही. २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपले, तरी पूर्वीची माहिती अद्याप सादर न केल्याने पोलीस महासंचालकांनी त्यांना अखेरची मुुदत दिली आहे. ७ दिवसांमध्ये त्यासंबंधी माहिती न दिल्यास त्यांची ही गैरवर्तणूक समजली जाईल. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांवर ते कार्यरत असलेल्या घटकप्रमुखांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश दिले असल्याचे मुख्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
>संबंधित अधिकारी
ए. एच. साळवे (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनी), डी. आर. कुलकर्णी (तांत्रिक विभाग, एटीएस), व्ही. डी. पांढरे ( राज्य सुरक्षा महामंडळ), नितीन पवार वाहतूक, नवी मुंबई), मनोज लोहार (राज्य सुरक्षा महामंडळ), सुनील भारद्वाज (परिमंडळ-४, ठाणे ), डी. पी. प्रधान ( रागुवि, मुंबई), शीला साईल (विशेष कृती दलाचे स्टाफ अधिकारी), एस. एस. बुरसे (क्राइम ब्रॅच, मुंबई), एस. व्ही. साळुंके-ठाकरे (बंदर परिमंडळ, मुंबई), नम्रता पाटील-चव्हाण (एनआयए, मुंबई), पराग मानेरे (सीआयडी,ठाणे शहर), निकेश खाटमोडे (टी.सी.एटीएस), संदीप भाजीभाकरे (आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर), संदीप जाधव (रागुवि, मुंबई), दीपक देवराज (पश्चिम रेल्वे, मुंबई), सुनील लोखंडे (परिमंडळ-५, ठाणे शहर), भगवान यशोद (पालघर), किरणकुमार चव्हाण (परिमंडळ-१२, मुंबई), प्रशांत खैरे (परिमंडळ -१, नवी मुंबई), गीता चव्हाण (एटीएस, मुंबई),एस. एस. घार्गे (ट्रेनिंग स्कूल, मरोळ) आदी.