४८ लाख टन उसाचे उत्पादन
By admin | Published: January 25, 2016 02:57 AM2016-01-25T02:57:28+5:302016-01-25T02:57:28+5:30
राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.
सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदा सरासरी १०.७० टक्के साखर उतारा मिळाला आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाने दिली आहे.
पुढील अडीच महिन्यांत शेतातच उभ्या असलेल्या ३२५ लाख टन उसाचे वेळेत गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांपुढे आहे. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, सर्व कारखान्यांचे मिळून ५५ ते ६० टक्के उसाचे गाळप करण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत शेतात ४० ते ४५ टक्के ऊस उभा आहे. या वर्षी पाण्याची कमतरता पाहता, राज्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याची भीती आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यातील ७० कारखान्यांपैकी ९० टक्के साखर कारखाने बंद स्थितीत आहेत. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. एकाही धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. बीडमधील माजलगाव धरणामध्ये गेल्या वर्षापासूनच शून्य टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील अवघे तीन साखर कारखाने सुरू आहेत. पाण्याअभावी ऊस वाळला आहे. त्यामुळे कारखानदारांना कारखाने बंद ठेवण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे चालू हंगामात ९० लाख टन उसाच्या गाळपाचा अंदाज होता. त्यापैकी ५४ लाख ३८ लाख २२९ टनाचे गाळप झाले आहे.
सहकारातील तज्ज्ञांनी ९० लाख टनांचा केलेला अंदाज पाण्याच्या कमतरतेमुळे ८० लाख टनांवर येण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात अजून २५ लाख टन ऊस शेतात उभा आहे, असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)