४८२ संकेतस्थळे ब्लॉक करा
By Admin | Published: July 7, 2016 12:10 AM2016-07-07T00:10:26+5:302016-07-07T00:10:26+5:30
बालाजी मोशन पिक्चर्स लि. चा ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इंटरनेटवर उपलब्ध झाल्याने उच्च न्यायालयाने संबंधित ४८२ संकेतस्थळे ब्लॉक करण्याचा आदेश सायबर सेलला
मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्स लि. चा ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इंटरनेटवर उपलब्ध झाल्याने उच्च न्यायालयाने संबंधित ४८२ संकेतस्थळे ब्लॉक करण्याचा आदेश सायबर सेलला दिला. तसेच डीटीएच आॅपरेटर्स व केबलधारकांनाही हा चित्रपट दाखवण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.
सुमारे ८०० संकेतस्थळांकडे चित्रपटाची कॉपी आहे. त्या सर्व संकेतस्थळांमुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच उपलब्ध झाला आहे, असे ‘बालाजी’तर्फे ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाला सांगितले. यासंदर्भात मुंबईच्या सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून बहुतांश टिष्ट्वटर हॅण्डलर्सनी टोरन्ट लिंकवरून तो डाऊनलोड केल्याचे मान्य केले आहे, असेही धोंड यांनी न्या. पटेल यांना सांगितले.
त्यावर खंडपीठाने संबंधित संकेतस्थळांचीच नावे द्या, असे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले. ज्या संकेतस्थळांनी चित्रपट उपलब्ध केला किंवा ज्यांच्यावर तुमचा संशय आहे, अशाच संकेतस्थळांची नावे द्या. सरसकट आदेश दिला तर काही संकेतस्थळांवर याचा परिणाम होईल, असे न्या.पटेल यांनी सांगितले.
‘लीक’ करणाऱ्या साइट्सचा अभ्यास करण्यासाठी खासगी सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीने ४८२ संकेतस्थळे जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तसेच गुगललाही या लिंक बंद करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती अॅड. धोंड यांनी न्यायालयाला दिली.
धोंड यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. पटेल यांनी मुंबई सायबर सेलला संबंधित ४८२ संकेतस्थळ ४ आॅक्टोबरपर्यंत ब्लॉक करण्याचा आदेश दिला. तसेच न्यायालयाने सर्व केबलधारकांना व डीटीएच आॅपरेटर्सना निर्मात्याच्या संमतीशिवाय चित्रपट दाखवू नका, असे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)