४९ हजार शेतकऱ्यांचा सात-बारा होणार कोरा
By admin | Published: June 25, 2017 12:56 AM2017-06-25T00:56:27+5:302017-06-25T00:56:27+5:30
शेतकऱ्यांची कर्जमाफी : दीड लाख प्रामाणिक शेतकऱ्यांनाही मिळणार २८५ कोटी; जिल्ह्याला सुमारे ५०० कोटींचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दीड लाखाच्या कर्जमाफीत जिल्हा बॅँकेशी संलग्न सुमारे ४९ हजार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. या शेतकऱ्यांना अंदाजे १७३ कोटींची कर्जमाफी होणार असून, दीड लाखापेक्षा अधिक व निकषांत बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे ३००० होत आहे.
त्याचबरोबर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या दीड लाख शेतकऱ्यांना सुमारे २८५ कोटी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार
आहे. दीड लाखापर्यंत, दीड
लाखाच्या वर व प्रामाणिक परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना सुमारे ५०० कोटींचा लाभ होणार आहे.
कर्जमाफीवरून गेले दोन-तीन महिने राज्य धुमसत आहे. राज्य सरकारने ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली; पण त्याला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर त्यात
बदल करून दीड लाखापर्यंतचे कर्जमाफी करण्याची घोषणा शनिवारी केली.
जिल्हा बॅँकेशी संलग्न दीड लाखापर्यंत ४९ हजार ९३७ शेतकऱ्यांची १७३ कोटी ३० लाखाची थकबाकी आहे. दीड लाखापेक्षा अधिक ३३२५ शेतकरी असून, त्यांच्याकडे ८६ कोटींची थकबाकी आहे; पण या शेतकऱ्यांचे सरसकट दीड लाख रुपये माफ होणार असल्याने त्यांना ४९ कोटी ८७ लाखांचा लाभ होण्याची शक्यता आहे.
थकबाकीदारांना कर्जमाफी देण्याबरोबरच प्रामाणिकपणे
परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने दिलासा (हॅलो ४ वर)
दीड लाखापर्यंतचे
बहुतांश शेतकरी निकषात
सरकारच्या निकषात दीड लाखापर्यंतचे बहुतांश शेतकरी बसू शकतात; कारण हे अत्यल्प भूधारक शेतकरी असल्याने हे आयकरसह इतर निकषांच्या बाहेर जाणाऱ्यांची संख्या फारच कमी असणार आहे.
राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. नियमित कर्ज भरत असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जाच्या रकमेवर २५ टक्के मदत मिळणार आहे. राज्यात ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची मदत होईल. ३० जून २०१६ ही कर्जमाफीची अंतिम मुदत असेल. २०१२ ते २०१६ ही दुष्काळाची वर्षे यात गृहीत धरली आहेत. भाजपचे सर्व मंत्री आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार आहेत. सर्वपक्षीय लोकांशी चर्चा करून ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली असून हा पंजाब, कर्नाटक तसेच देशातील अन्य राज्यांपेक्षा आणि देशाच्या इतिहासातील मोठा ऐतिहासिक निर्णय आहे.
-चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री
दीड लाखाची मर्यादा ठेवल्याने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा कसा होणार? प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ २५ हजार मदत करून अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कर्ज घेतलेले भरायचे नाही, ही प्रवृत्ती बळावण्याची शक्यता अधिक आहे.- आमदार हसन मुश्रीफ
अत्यंत पारदर्शकपणे ही कर्जमाफी होणार असून, ती फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचाच हक्क आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे. आता सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे आणि ३४ हजार कोटी रुपयांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळत असल्याने ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे. - आमदार सुरेश हाळवणकर
केंद्राच्या मदतीशिवाय राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचे
स्वागत करतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कर्जमाफीसाठी आग्रही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. येथून पुढे शेतीमालाला हमीभाव व वेळेवर वीज, पाणी दिल्यास कर्जमाफीची गरज भासणार नाही. - आमदार चंद्रदीप नरके
सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते, पण सध्या जाहीर केलेल्या कर्जमाफीप्रमाणे ४० लाख शेतकऱ्यांचाच सात-बारा कोरा होईल, तर ४९ लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. या अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणार का ? त्यासाठी तरतूद केली आहे का ? काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रा व शेतकऱ्यांच्या दबावामुळे सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले. याशिवाय सीआयडीने शेतकऱ्यांचा उद्रेक होईल हा अहवाल दिल्याने घूमजाव करीत कर्जमाफीचा निर्णय घेणे शासनाला भाग पडले. - आमदार सतेज पाटील
सरकारच्या धाडसी निर्णया-बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचे अभिनंदन करते. हा ऐतिहासिक निर्णय आहे. शेतकऱ्यांवरील संकट दूर
करून त्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त केले. - शौमिका महाडिक
(अध्यक्षा, जि. प.)