अवघ्या पाच महिन्यांत क्रॅक केली चौथी पोस्ट! हॅट्ट्रिक झाली, आता नम्रताचा चौकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 07:43 AM2024-06-13T07:43:58+5:302024-06-13T07:44:53+5:30
MPSC News: नम्रता दत्तात्रय पौळ या अवघ्या २४ वर्षे वयाच्या मुलीने स्पर्धा परीक्षा देत एकाच महिन्यात दोन पोस्ट ‘क्रॅक’ केल्याचे कौतुक होत असतानाच सलग दुसऱ्या महिन्यात लोकसेवा आयोगाची तिसरी पोस्ट काढली होती. आता तर तिच्या नावे आणखी एक ‘रेकॉर्ड’ झाले आहे.
- बालाजी अडसूळ
कळंब (जि. धाराशिव) - नम्रता दत्तात्रय पौळ या अवघ्या २४ वर्षे वयाच्या मुलीने स्पर्धा परीक्षा देत एकाच महिन्यात दोन पोस्ट ‘क्रॅक’ केल्याचे कौतुक होत असतानाच सलग दुसऱ्या महिन्यात लोकसेवा आयोगाची तिसरी पोस्ट काढली होती. आता तर तिच्या नावे आणखी एक ‘रेकॉर्ड’ झाले असून, लोकसेवा आयोगाच्या ‘सब रजिस्ट्रार’ पदाला गवसणी घालत अवघ्या पाचव्या महिन्यात यशाचा चौकार तिने लगावला आहे.
नम्रता पौळ ही मूळ राहणार वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील असली तरी तिचा हल्ली मुक्काम कळंब तालुक्यातील आंदोरा येथे आहे. जिद्दी व कष्टाळू या मुलीच्या ‘बायो’त सर्वात दखलपात्र काय तर अवघ्या पाच महिन्यांत ४ स्पर्धा परीक्षेत ‘पोस्ट क्रॅक’ करत मिळविलेले यश. नम्रताचे मार्गदर्शक व समर्थ फाउंडेशनचे प्रमुख प्रा. बनेश्वर शिंदे सांगतात की, नम्रता ही स्पर्धेच्या काळात करिअरच्या मार्गावरील इतर विद्यार्थ्यांसाठी एक ‘आयडॉल’ आहे. ध्येयनिष्ठ, त्याच्या पूर्ततेसाठी सातत्यपूर्ण अभ्यास हे तिच्या यशाचे गमक आहे.
मी बीएस्सी तृतीय वर्षाला असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी रिव्हिजन आणि प्रश्नपत्रिका सोडविणे, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्य या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. - नम्रता पौळ
खेड्यात राहूनही यशाला गवसणी
- लहानपणीच माता-पित्यांचे छत्र हरवलेल्या नम्रता हिचा सांभाळ करत आंदोरा येथील आजी चंद्रभागा तांबारे व मावशी छाया अशोक पाटील यांनी मायेचा पदर पुढे केला.
- याच बळावर आपल्या दोन भावंडांसह नम्रता खंबीरपणे स्पर्धेला तोंड देत स्वयंसिद्धा ठरली आहे. बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केलेल्या अतिशय ‘नम्र’ अशा नम्रताने पुणे, मुंबई न गाठता आंदोरा या खेड्यात वास्तव्य करत स्पर्धा परीक्षेत हे यश मिळवले आहे. तिच्या यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.