संमेलनाला हवेत ५ कोटी
By Admin | Published: October 11, 2016 03:06 AM2016-10-11T03:06:20+5:302016-10-11T03:06:20+5:30
गेल्यावर्षींचे पिंपरीतील साहित्य संमेलन थाटामाटात पार पडले. आयोजकांनी जरी त्याचा खर्च दोन-अडीच कोटींच्या घरात असल्याचे सांगितले असले, तरी साहित्य रसिकांत
डोंबिवली : गेल्यावर्षींचे पिंपरीतील साहित्य संमेलन थाटामाटात पार पडले. आयोजकांनी जरी त्याचा खर्च दोन-अडीच कोटींच्या घरात असल्याचे सांगितले असले, तरी साहित्य रसिकांत मात्र तो खर्च १४ कोटींवर गेल्याची कुजबुज होती. त्यामुळेच यंदाचे संमेलन आटोपशीर खर्चात पार पाडावे, अशी सूचना महामंडळाने केली आहे. असे असले तरी या काटकसरीच्या संमेलनाच्या खर्चाचा प्राथमिक आकडाच पाच कोटींवर गेल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
हा आकडा अंदाजे असल्याचे आयोजकांनी सांगितले असून खर्चाचा एखादा आकडा डोळ््यासमोर असेल, तरच निधी गोळा करणे सोयीचे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या तरी सरकारचे २५ लाख आणि पालिकेचे ५० लाख असे ७५ लाख मिळणार असून अजून सव्वा चार कोटी उभे करण्याचे आव्हान निमंत्रकांना पेलावे लागणार आहे.
संमेलन स्मार्ट करणे, त्याला आधुनिक तंत्राची जोड देण्याच्या जितक्या मागण्या पुढे येतील तेवढा हा खर्च वाढत जाण्याची चिन्हे आहेत. संमेलनासाठी किमान पाच कोटींचा खर्च येईल, असा प्राथमिक अंदाज काढल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले. हा आकडा ढोबळ आहे. तो कदाचित कमीही होऊ शकतो. मात्र संमेलन आयोजनाच्या इतिहासानुसार तो वाढताच राहिला आहे. त्यामुळे जास्तीच्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे. एक आकडा समोर असेल, तर निधी गोळा करणे सोयीचे होते याकडे वझे यांनी लक्ष वेधले. आगरी यूथ फोरमचे पदाधिकारी शरद पाटील यांच्या मते, डोंबिवली क्रीडा संकुलात जो मुख्य मंडप उभारला जाणार आहे. त्याचाच खर्च ५० लाखांवर जाईल. मंडप व्यवस्था, जेवण, नाश्ता आणि साहित्यिक, रसिक यांच्या राहण्याच्या व्यवस्थेवरच सर्वाधिक खर्च होतो. किमान तीन हजार जणांची राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी कलापूर्ण मंडप उभारून देण्याचे मान्य केले असले, तरी त्याच्या खर्चाचा अंदाज अद्याप समजलेला नाही. संमेलनातून साहित्यिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्स्ािंगद्वारे संवाद साधण्याची मागणी सुरू आहे. त्यासाठी मोठे स्क्रिन, प्रोजक्टर, जादा स्पीडचे इंटरनेट आदी लागेल. शिवाय संमेलनाचे अॅप, वेबसाईट सुरू करण्याची कल्पना आहे. त्यांचाही खर्च लाखांच्या घरात जाईल. लाइव्ह-टॅक्नोसॅव्ही संमेलनाचा खर्चच अधिक आहे. (प्रतिनिधी)
मानधन, निवास व्यवस्थेवर खर्च-
खर्चाच्या कोटीच्या कोटी उड्डाणांबाबत साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी उज्ज्वला मेहेंदळे म्हणाल्या, खर्चाची बाजू व निधी जमवण्याची जबाबदारी निमंत्रक संस्थेकडे असते. पिंपरी-चिंचवडला मागच्या वर्षीचे संमेलन पार पडले. तेथील निमंत्रक संस्था मोठी असल्याने त्यांनी पुष्कळ सभागृहे आणि विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्याने खर्च वाढला होता.
तो खर्च साधारणपणे दीड कोटींच्या घरात होता. केवळ मंडप उभारणीवरच ५० ते ६० लाख रुपये खर्च होतात. तीन दिवस परिसंवाद असतात. त्यासाठी येणाऱ्या साहित्यिकांचे मानधन द्यावे लागते. राहण्याची व्यवस्था करावी लागते. डोंबिवलीत हॉटेलचे भाडे अधिक आहे. डोंबिवली हे मुंंबईजवळ असल्याने जास्तीत जास्त लोक संमेलनास हजेरी लावतील.
काही साहित्यिक ज्येष्ठ असतात. त्यांना साध्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था चालत नाहीत. त्यांच्याकरीता गाडीची व्यवस्था करणे, त्यांना कार्यक्रमस्थळी नेणे-आणणे आदी पाहावे लागते. स्टेज, पंखे आदींची व्यवस्था करावी लागते. सरकारकडून केवळ २५ लाखांचा निधी येतो. तो निधी अपुरा असतो.
संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय मंडळी नकोत हा मुद्दा रास्त असतो. त्याच्याशी महामंडळही सहमत असते. मात्र ज्या शहरात संमेलन भरते, तेथील महापौर, मंत्री, आमदार यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने ते निधी गोळा करण्यास मदत करतात. त्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर मान द्यावा लागतो. सरकारने पुरेसा निधी दिल्यास, तो वाढवून दिल्यास राजकीय मंडळीची गरजच भासणार नाही.
मंत्री, आमदार किती निधी देणार?
ठाण्यातील नाट्यसंमेलनावेळी मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांनी अनेक मार्गांनी मदत केली होती. आमदार प्रताप सरानाईक यांनी जेवणाचा साधारण ३५ ते ४० लाखांचा खर्च उचलला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांनी १० लाख, तर आमदार सुभाष भोईर यांनी पाच लाख जाहीर केले होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने ११ लाख, नवी मुंबईने १० लाख, भिवंडीने पाच लाख रूपये दिले होते. शिवाय मीरा भाईंदर महापालिका, अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकांनीही साह्य केले होते. त्यामुळे डोंबिवलीतील साहित्य संमेलनाला ते किती मदत करणार याकडे आयोजकांचे लक्ष आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अन्य तीन आमदार, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, पालिकेतील वेगवेगळे पक्षनेते, नगरसेवक, अन्य पालिकातील राजकीय नेते किती निधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.