कापूस व्यापाऱ्यांना ५ कोटींचा चुना
By admin | Published: March 14, 2016 02:36 AM2016-03-14T02:36:23+5:302016-03-14T02:36:23+5:30
खान्देशातील सुमारे ५० कापूस व्यापाऱ्यांची रक्कम थकवून गुजरातमधील दोन जिनिंगचालक फरार झाले आहेत. त्यांनी व्यापाऱ्यांना जवळपास ५ कोटी रुपयांना चुना लावल्याचे सांगितले जात आहे.
नंदुरबार : खान्देशातील सुमारे ५० कापूस व्यापाऱ्यांची रक्कम थकवून गुजरातमधील दोन जिनिंगचालक फरार झाले आहेत. त्यांनी व्यापाऱ्यांना जवळपास ५ कोटी रुपयांना चुना लावल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कापसाचे व्यापारी ग्रामीण भागात कापसाची खरेदी केल्यानंतर गुजरातमधील विविध भागातील जिनिंग फॅक्टऱ्यांमध्ये तर काही व्यापारी दलालामार्फत कापसाची विक्री करतात. माल दिल्यानंतर जिनिंगचालक टप्प्याटप्प्याने रक्कम देतात. व्यापाऱ्याने पुन्हा माल आणल्यानंतर आधीची रक्कम दिली जाते. साधारण १० दिवसांचा हा वायदा असतो.
खान्देशातून विशेषत: जळगाव जिल्ह्यातून दररोज सर्वाधिक ३०० ते ४०० ट्रक कापूस गुजरातला रवाना होतो.
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाठाणीचे दर ६५ सेंटवरून अचानक ५८ सेंटपर्यंत घसरले आणि त्याचा फटका जिनिंगचालकांना बसला. रूईचे दरदेखील अचानक खाली आहे. परिणामी, गुजरातमधील दोन जिनिंगचालकांनी येथून अचानक गाशा गुंडाळला. (प्रतिनिधी)