पक्ष्यांची विमानाला धडक ५ कोटींना; वर्षभरात महाराष्ट्रात विमानाला धडकले १३१ पक्षी

By मनोज गडनीस | Published: January 7, 2024 05:54 AM2024-01-07T05:54:09+5:302024-01-07T05:55:17+5:30

दिल्लीत सर्वाधिक १६९ घटना

5 crores of birds hitting the plane; 131 birds hit the plane in Maharashtra during the year | पक्ष्यांची विमानाला धडक ५ कोटींना; वर्षभरात महाराष्ट्रात विमानाला धडकले १३१ पक्षी

पक्ष्यांची विमानाला धडक ५ कोटींना; वर्षभरात महाराष्ट्रात विमानाला धडकले १३१ पक्षी

मनोज गडनीस, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उड्डाणावेळी, धावपट्टीवर उतरताना वा हवेत असताना विमानाला पक्षी धडकण्याच्या घटनांत गेल्या काही वर्षांत वाढ झाली असून नुकत्याच सरलेल्या २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या आकाशात एकूण १३१ पक्ष्यांनी विमानाला धडक दिली. तर दिल्लीत १६९ वेळा असा प्रकार घडला. देशभरात एकूण १०१७ घटनांची नोंद झाली. नुकसान भरून काढण्यासाठी विमान कंपन्यांना तब्बल एक ते पाच कोटी रुपयांचा खर्च येतो. 
विमान अपघातांत पक्ष्याची धडक ही सर्वात गंभीर बाब आहे. सिम्युलेटरवर वैमानिकांना अशावेळी परिस्थिती कशी हाताळावी, याचे प्रशिक्षण दिले जाते. 

विमानतळाभोवती जास्त धोका

  • विमानतळ परिसर हा किमान २०० एकर किंवा त्यापेक्षा जास्त असतो. तिथे धावपट्टीखेरीज असलेल्या गवतामध्ये विविध प्रकारचे कीटक किंवा लहान-मोठे प्राणी असतात. त्यांच्या भक्षणासाठी पक्ष्यांचा तिथे वावर असतो. या संदर्भात डीजीसीएने नियमावली केली असून अशा प्राण्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी व पक्ष्यांना हाकलण्यासाठी पथके आहेत.
  • विमानतळ परिसरापासून १० किलोमीटर परिसरात मांसाहाराचे अवशेष आढळले तरी तिथे पक्षी येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे कटाक्षाने स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.


पक्षी अडकल्यास विमानाचा ताेल जाताे

विमान उडताना किंवा उतरताना पक्षी धडकला तर ते सर्वाधिक भीषण असू शकते. मुळात पक्ष्याचा आकार कितीही लहान असला तरी त्याची उडण्याची गती आणि विमानाची हवेतील गती या दोन गतिमान गोष्टी एकमेकांना धडकतात त्यावेळी ती धडक जबरदस्त बसते. त्यातून जर विमानाच्या पंखामध्ये पक्षी अडकला तर त्याचा थेट परिणाम विमानाचा तोल जाण्यात होतो. विमान हवेत ३० हजार किंवा तत्सम उंचीवरून उडत असते त्यावेळी अशी धडक झाली तर विमानाला सावरण्यासाठी त्याच्याकडे जागा असते. मात्र, विमान कमी उंचीवर असताना असा प्रकार घडला तर त्याची तीव्रता मोठी होऊ शकते.
- मंदार भारदे, विमान वाहतूक व्यावसायिक

विमा कंपन्यांना मिळाला ४ हजार काेटींचा महसूल

सद्य:स्थितीत देशातील ७७१ महाकाय विमाने व ३०० च्या आसपास लहान विमाने अशा एक हजारांवरील विमानांसाठी चार हजार कोटी रुपयांच्या आसपास महसूल विमा कंपन्यांना मिळत आहे. यामध्ये केवळ तांत्रिक समस्यांवरील खर्चच कव्हर होत नाही तर पक्ष्याने धडकल्यामुळे होणारे नुकसानदेखील कव्हर होते. एखादा पक्षी विमानाला धडकला तर विमानाचा समतोल जाऊन ते कोसळण्याची शक्यता असते. 

Web Title: 5 crores of birds hitting the plane; 131 birds hit the plane in Maharashtra during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.