निरीक्षणगृहातून ५ मुलींचे पलायन
By admin | Published: July 27, 2015 01:03 AM2015-07-27T01:03:50+5:302015-07-27T01:03:50+5:30
येथील निरीक्षणगृहातून पाच अल्पवयीन मुलींनी रविवारी पहाटे अडीच वाजता पलायन केले. सकाळी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला
अहमदनगर : येथील निरीक्षणगृहातून पाच अल्पवयीन मुलींनी रविवारी पहाटे अडीच वाजता पलायन केले. सकाळी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला. तीन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे प्रशासन अडचणीत आले आहे.
कोतवाली पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. येथील अमरधाम रोडवरील निरीक्षणगृहात अल्पवयीन गुन्हेगार, अनाथ व पालकांनी नाकारलेली मुले ठेवली जातात. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून आणणे, मुलींचे अपहरण करणे अशा गुन्ह्यातील ज्या पीडित मुलींना पालकांनी नाकारले, त्यांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. रविवारी पहाटे अडीच वाजता निरीक्षणगृहाच्या काळजीवाहक रेखा घनश्याम वर्मा झोपलेल्या असताना त्यांची नजर चुकवून त्यातील पाच मुलींनी पलायन केले. त्यांच्या रूममध्ये असलेली प्रवेशद्वाराची चावी घेऊन मुलींनी पळ काढला. सकाळी ६च्या दरम्यान वर्मा यांनी चावी शोधली असता, त्यांना सापडली नाही तसेच प्रवेशद्वारही उघडे दिसले. त्यानंतर चौकशी केली असता पाच मुली पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. निरीक्षणगृहाच्या व्यवस्थापिका सुमन शिवाजी जाधव यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
संबंधित पाच मुली नगर जिल्ह्यातीलच आहेत. अपहरण, लग्नाची फूस लावून पळवून नेण्याच्या प्रकरणातील त्या फिर्यादी आहेत. त्यांना पालकांनी नाकारल्याने निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते, असे पोलीस निरीक्षक मालकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)