५ किलो सोने हस्तगत
By admin | Published: September 11, 2015 03:14 AM2015-09-11T03:14:58+5:302015-09-11T03:14:58+5:30
कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) फरहाना अफरोज या बांगलादेशी महिलेला सोने तस्करीप्रकरणी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी मध्यरात्री अटक केली.
मुंबई : कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) फरहाना अफरोज या बांगलादेशी महिलेला सोने तस्करीप्रकरणी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी मध्यरात्री अटक केली. या तरुणीकडून ५ किलो सोने (१ कोटी २३ लाख) हस्तगत करण्यात आले. हे सोने तिने अंतर्वस्त्रात दडवले होते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फरहानाकडून हस्तगत झालेले सोने स्विस म्हणजेच स्वित्झर्लंडमधील आहे. या सोने तस्करीत बांगलादेशी नागरिकाचा झालेला वापर ही धक्कादायक बाब आहे. फरहानाच्या पासपोर्टनुसार ती याआधीही भारतात आल्याचे स्पष्ट होते. मात्र ती प्रथमच मुंबईत आली होती. याआधी ती बांगलादेशातून भारतात आली, की अन्य कोणत्या देशातून व्हाया व्हाया भारतात आली, याचा शोध अधिकारी घेत आहेत. पहिल्याच भेटीत तिने पाच किलो सोने दडवून मुंबईत आणले यावरून ती सोने तस्करीत सराईत असावी, असा संशय एआययू अधिकाऱ्यांना आहे.
या प्रकरणी फरहानाला अटक करण्यात आली आहे. वरकरणी ती बांगलादेशातील चांगल्या, प्रतिष्ठित कुटुंबातली भासते. सोने कुठून आणले, कोणाच्या सांगण्यावरून आणले का, भारतात हे सोने कोणाला देणार होती? याबाबत तिच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एआययूचे अपर आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला दिली.