कोरोनामुळे राज्यात ५ लाख ९४ हजार जण क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:03 AM2020-06-11T06:03:20+5:302020-06-11T06:03:32+5:30

राज्यात १ लाख २४ हजार गुन्हे दाखल : ६ कोटी ८६ लाखांचा दंड वसूल

5 lakh 94 thousand people quarantined | कोरोनामुळे राज्यात ५ लाख ९४ हजार जण क्वारंटाईन

कोरोनामुळे राज्यात ५ लाख ९४ हजार जण क्वारंटाईन

Next

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ९३७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत; तसेच ५ लाख ९४ हजार ५४३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.राज्यात २२ मार्च ते ९ जून या लॉकडाऊनच्या कालावधीत कलम १८८ नुसार १,२४,३६९ गुन्हे नोंद झाले असून, २३,९८६ जणांना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ८६ लाख ७४ हजार ६९१ रुपयांचा दंड आकारला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्यावर हल्ल्याचेही प्रकार घडले आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६३ घटना घडल्या. त्यात ८४६ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यांत २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०१,०९७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच, राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ७२२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९४,५४३ व्यक्ती क्वारंटाईन आहेत.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ८०,८९० वाहने जप्त करण्यात आली. तसेच, परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदविले आहेत. राज्यात सध्या एकूण २७४ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास १२,६६४ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. सरकारी सूचनांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


पोलिसांसाठी राज्य नियंत्रण कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील २० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २१, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३४ पोलीसवीरांना जीव गमवावा लागला. पोलिसांना काही लक्षणे दिसून आली, तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९० पोलीस अधिकारी व १२६९ पोलीस कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: 5 lakh 94 thousand people quarantined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.