महावितरण कार्यालयात ५ लाखांचा अपहार
By admin | Published: June 24, 2016 11:33 PM2016-06-24T23:33:19+5:302016-06-24T23:33:19+5:30
वीज देयकाच्या एटीपी मशीनमधून उडविले पैसे; युवतीसह दोघांविरुद्ध गुन्हा.
खामगाव: येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयातील वीज बिलाचा भरणा करणार्या एटीपी मशीनमधून युवतीसह दोघांनी संगनमत करून परस्पर ५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी २४ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर येथील अँड टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीकडून वीज बिलाचा भरणा करणारी एटीपी मशीन येथील मुख्य कार्यालयात लावण्यात आली आहे. मशीन हाताळण्यासाठी कंपनीकडून रूपाली मुळे रा. पिंपळगाव राजा व प्रवीण गजानन इंगळे रा.वाडी या दोघांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली होती. सदर एटीपी मशीनमध्ये जमा होणारी वीज बिलाची रक्कम दररोज महावितरणच्या एसबीआय बँकेच्या खात्यामध्ये जमा केली जाते; परंतु ९ जून रोजीची सुमारे ५ लाख ९१ हजार १५२ रुपये रूपाली मुळे आणि प्रवीण इंगळे यांनी बँकेत न भरता परस्पर अपहार केला. नागपूर येथील कंपनीचे सिनिअर इंजिनिअर एटीपी मशीनची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना ९ जून रोजीची ५ लाख ९१ हजार १५२ रुपये ही रक्कम बँकेत जमा न झाल्याचे लक्षात आले. यावरून त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध पैशाचा अपहार केल्याबाबत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम ४0९, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.