उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ५ लाखांचा पुरस्कार; राज्य सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 12:44 PM2022-08-31T12:44:11+5:302022-08-31T12:44:50+5:30
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई - गणेशोत्सवावरील निर्बंध हटवून शिंदे-फडणवीस सरकारनं लोकांना आनंदात, जल्लोषात आणि काळजीपूर्वक सण साजरा करण्याचं आवाहन केले आहे. त्यानंतर आता राज्य शासनाने ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्यास २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु वाढता प्रतिसाद आणि मुदतवाढीची मागणी विचारात घेऊन सदर ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आता २ सप्टेंबर करण्यात येत आहे. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक २ सप्टेंबर २०२२ पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
सामाजिक भान जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प केला असून त्याच्यापूर्तीसाठी आपल्या मनातलं आमचं सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्याच्या विकासाचं मनोरथ पूर्णत्वास जाण्यासाठी आपली साथही हवी आहे. कोरोना संकटामुळं मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, अशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.