मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख, तर रेल्वे मंत्रालयाकडून 5 लाखांची मदत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 05:11 PM2017-09-29T17:11:43+5:302017-09-29T17:13:05+5:30
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज केईएम हॉस्पिटलला भेट दिली आहे. जखमींचा विचारपूस केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
मुंबई, दि. 29 - केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज केईएम हॉस्पिटलला भेट दिली आहे. जखमींचा विचारपूस केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमी असलेल्यांना 1 लाखांची मदत दिली असून, किरकोळ जखमी असलेल्यांना 50 हजारांपर्यंतची मदत देण्याची घोषणा केली आहे.
परळ-एलफिन्स्टन ब्रीजच्या पाय-यांचं तात्काळ रुंदीकरण करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. मुंबईतल्या पादचारी पुलांच्या सुरक्षितता व क्षमतांच्या दृष्टीनं ऑडिट करण्याचेही पीयूष गोयल यांनी आदेश दिले आहेत. कोणीही या दुर्घटनेचं राजकारण करता कामा नये, प्रत्येक जण संधीच्या शोधातच मुंबईतून प्रवास करत असतात, असंही मनोज सिन्हा म्हणाले आहेत. एलफिन्स्टन स्टेशनवर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे मंत्र्यांचा आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसंच पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत. रेल्वे मंत्र्यांनी केईएम हॉस्पिटललाही भेट देऊन मृतांची विचारपूस केली आहे.
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी
परळ-एलफिन्स्टन पुलावर आज झालेल्या भीषण दुर्घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त प्रवाश्यांनी केली आहे. लोकं मरतात. त्यानंतरच प्रशासनाला जाग येते. हा आपला देश आहे, अशी संतप्त प्रतिक्रियाही प्रवाश्यांनी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी घटनेनंतर प्रवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. रोजच या गर्दीतून आम्हाला प्रवास करावा लागतो. रोजच आमचा मृत्यूशी सामना असतो. हा पुल आणि इथे होणारी गर्दी हे रेल्वेला आणि सरकारलाही माहीत आहे. पण तरीही सरकार त्याबद्दल गंभीर नाही. त्यामुळे या घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.
एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू
मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 33 जण जखमी झाले आहेत. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे. आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. तर एका व्यक्तिच्या सांगण्यानुसार प्रचंड गर्दीच्यावेळी एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली.
अफवांवर विश्वास ठेवू नका
अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केले हेल्पलाईन क्रमांक
केईएम हॉस्पिटल : 022-24107000
वेस्टर्न रेल्वे कंट्रोल रूम : 022-23070564, 022-23017379, 022-23635959
मुंबई रेल्वे कंट्रोल रूम : 022-23081725
ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सअॅप नंबर : 8454999999