गारठा सुसह्य करण्यासाठी रुपयात ५ लीटर गरम पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 02:14 AM2018-12-31T02:14:23+5:302018-12-31T02:14:34+5:30
कडाक्याच्या थंडीच्या दिवसात ग्रामस्थांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीने केवळ एक रुपयात ५ लीटर गरम पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
पंढरपूर (जि़सोलापूर) : कडाक्याच्या थंडीच्या दिवसात ग्रामस्थांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीने केवळ एक रुपयात ५ लीटर गरम पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सोलर वॉटर हीटरवर ही सुविधा असून असा उपक्रम राबविणारी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
तावशी गावाची लोकसंख्या ५ हजार आहे. येथील उपक्रमशील ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा निर्मलग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार मिळाला होता़ या पुरस्कारांतर्गत ग्रामपंचायतीला ५ लाख रुपयांचा निधी मिळाला़ या निधीतील दीड लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने एक हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी ग्रामपंचायतीच्या इमारतीवर ठेवली़ शिवाय इमारतीला सोलर वॉटर हीटर बसविले. या वॉटर हीटर एटीएममध्ये एक रुपयाचे नाणे टाकल्यास ५ लीटर गरम पाणी मिळते. हा साधा उपाय करून ग्रामपंचायतीने गावातील महिलांचा त्रास कमी केला आहे़
पहिलाच उपक्रम
तावशी ग्रामपंचायतीच्या वतीने एक रुपयामध्ये ५ लीटर व ५ रुपयांमध्ये २५ लीटर गरम पाणी देण्याचा हा जिल्ह्यातील एखाद्या ग्रामपंचायतीने राबविलेला पहिलाच उपक्रम आहे.