पाच वर्षीय बालिकेचे अपहरण
By admin | Published: June 24, 2016 11:29 PM2016-06-24T23:29:46+5:302016-06-24T23:29:46+5:30
आकोट येथे चॉकलेटचे आमिष देऊन पाच वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याची घटना.
आकोट (जि. अकोला): स्थानिक जिजामाता चौकानजीक असलेल्या सितला माता मंदिरापासून चॉकलेटचे आमिष देऊन पाच वर्षीय मनुश्री नामक बालिकेचे अपहरण केल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ११.३0 वाजता सुमारास घडली. सदर बालिकेचे अपहरण एका अज्ञात महिलेने केल्याचे प्रत्यक्षदश्रींनी पोलिसांना सांगितले. महिलेच्या वर्णनावरून पोलिसांनी नाकेबंदी करून शोधाशोध केली आहे.
जिजामाता नगरातील संतोष श्यामराव लाकडे सेंट्रिंगचे काम करतात. त्यांची साडेपाच वर्षांची मनुश्री नामक मुलगी सकाळी शितला माता मंदिराजवळ सवंगड्यांसह खेळत होती. या ठिकाणी एका अज्ञात महिला आली. तिने मनुश्रीला जवळ घेत खाऊ दिला. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या दुसर्या मुलाला मोबाइल रिचार्ज आणण्याकरिता पाठविले आणि मनुश्रीला घेऊन त्या अज्ञात महिलेने पोबारा केला. घटनास्थळावर मनुश्री दिसत नसल्याने तिचे आई-वडील व परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देत सर्वत्र शोधाशोध सुरू केली. यावेळी मनुश्री सोबत असलेल्या मुलाने सदर महिला ही सावळ्या रंगाची असून पोपटी, गुलाबी रंगाची डिझाइनची साडी नेसली असल्याचे वर्णन पोलिसांना सांगितले. या वर्णनावरून पोलिसांनी मनुश्रीचा फोटो सोबत घेऊन रेल्वे स्टेशन, झरी गेट, परतवाडा मार्गासह विविध मार्गांवर नाकेबंदी करून शोध घेतला. मनुश्रीचे अपहरण झाल्याच्या घटनेची माहिती होताच सर्वत्र सोशल मीडियावर तिचा फोटो व माहिती अपलोड करण्यात आली आहे.