हिवाळी अधिवेशनासाठी ५० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:53 AM2021-10-21T06:53:24+5:302021-10-21T06:54:41+5:30
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नागपुरातच हे अधिवेशन होईल, यावर निर्णय झाल्यावरच पीडब्ल्यूडी प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे.
नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर जवळपास ५० कोटी रुपये खर्च होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नागपुरातच हे अधिवेशन होईल, यावर निर्णय झाल्यावरच पीडब्ल्यूडी प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे.
सोमवारी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी उच्चस्तरीय समीक्षा बैठकीनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. तेव्हापासून अधिवेशनाच्या तयारीने गती पकडली आहे. साधारणत: ३० कोटी रुपयांच्या कार्याची निविदा जारी करण्यात आली आहे, तर २० कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या सगळ्या निविदा लवकरच वितरित केल्या जातील, असे पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी सांगितले.