अमृत योजनेंतर्गत ५० कोटी
By admin | Published: October 17, 2016 02:29 AM2016-10-17T02:29:57+5:302016-10-17T02:29:57+5:30
१० शहरातील पाणीपुरवठा योजनांचे ई-उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मंत्रालयातून पार पडले.
पनवेल : केंद्र शासनाच्या कल्याणकारी अमृत योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १० शहरातील पाणीपुरवठा योजनांचे ई-उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मंत्रालयातून पार पडले. एकूण ६३२ कोटींच्या अमृतधारा योजनेंतर्गत पनवेल शहराचा देखील समावेश करण्यात आला असून शहरासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका सभागृहात हा कार्यक्र म आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला.
शहरात मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पनवेल शहराला मिळालेल्या ५० कोटींच्या निधीमध्ये महापालिका २७ कोटींचा निधी जेएनपीटीला पाणीपुरवठा करणाऱ्या एमजेपीच्या जीर्ण वाहिन्यांच्या नूतनीकरणासाठी केला जाणार आहे. तर उर्वरित निधी शहरात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार आहे. पनवेल महापालिका सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर हे देखील उपस्थित होते.
आयुक्त शिंदे यांनी अमृत योजनेची माहिती यावेळी दिली तसेच एमजेपी वाहिनीसह पाच नवीन इएसआर बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी शेकाप नेते जे. एम. म्हात्रे, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, माजी विरोधी पक्षनेते संदीप पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, जयंत पगडे आदींसह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)