देवल क्लबला ५० लाखांची देणगी
By admin | Published: September 9, 2015 12:26 AM2015-09-09T00:26:43+5:302015-09-09T00:26:43+5:30
ज्योत्स्ना टेंबे यांची मदत : नाट्यगृहाचे ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ असे नामकरण करणार
कोल्हापूर : रागांच्या लक्षणगीतांचे रचनाकार, नाट्यसंगीताला रागदारी संगीताचे वळण देणारे संगीतकार, अग्रणी कलावंत आणि कलाक्षेत्रातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व लाभलेले रसिकाग्रणी गोविंदराव टेंबे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पणती ज्योत्स्ना टेंबे-खांडेकर यांनी गायन समाज देवल क्लबला ५० लाखांची देणगी दिल्याची माहिती देवल क्लबचे पदाधिकारी श्रीकांत डिग्रजकर व पंडित सुधीर पोटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. गोविंदराव टेंबे यांचा आणि देवल क्लबचा स्थापनेपासूनचा ऋणानुबंध होता. त्यांनी ‘माझा संगीत व्यासंग’सारख्या ग्रंथाचे लेखन केले. चित्रपटसृष्टीत निर्मिती, संवाद, संगीत आणि अभिनय अशी उज्ज्वल कारकिर्द त्यांनी गाजविली. संस्थेची जुना देवल क्लब येथील वास्तू उभारली तेव्हा टेंबे हे देवल क्लबचे संचालक होते. येथील मैफलींत ते संगीतसेवा देत. या क्लबशी असलेला हा ऋणानुबंध लक्षात घेऊन प्रस्तावित नाट्यगृहासह विविध विकासकामांसाठी ज्योत्स्ना टेंबे यांनी ही देणगी संस्थेला दिली आहे. या रकमेतून नाट्यगृहाचे व्यासपीठ, देवल क्लबच्या मुख्य प्रवेशद्वाराची कामे करण्यात येणार आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ज्योत्स्ना टेंबे या एका फायनान्स कंपनीत नोकरीला आहेत. आपल्या पणजोबांनी कलाक्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचे कायम स्मरण राहावे, त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, या इच्छेने त्यांनी सगळी जमापुंजी देवल क्लबला दिली आहे.
गोविंदराव टेंबे यांचे योगदान कायम स्मरणात राहावे यासाठी संस्थेच्या नाट्यगृहाचे ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ असे नामकरण करण्यात येणार आहे. परिषदेस प्रभाकर वर्तक, अरुण डोंगरे, डॉ. वासंती टेंबे, दिलीप गुणे, राजेंद्र पित्रे, सुबोध गद्रे, उमा नामजोशी उपस्थित होत्या.
पुढील वर्षी सोहळा
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ज्योत्स्ना टेंबे यांच्या उपस्थितीत
२ व ३ जानेवारी २०१६ रोजी नाट्यगृहाच्या नामकरणाचा सोहळा होणार असून, याच वेळी गोविंदराव टेंबे यांच्या योगदानावर आधारित विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.