५० लाखांचे सोने लुटले !
By admin | Published: June 18, 2015 02:23 AM2015-06-18T02:23:08+5:302015-06-18T02:23:08+5:30
प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करीत सहा सशस्त्र दरोडेखोरांनी बुधवारी भरदुपारी येथील मातोश्री इमारतीत कारागिरांना चाकूचा धाक दाखवून त्यांना दोरीने बांधून त्यांच्याकडील ५० लाख रुपये किमतीचे
जळगाव : प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करीत सहा सशस्त्र दरोडेखोरांनी बुधवारी भरदुपारी येथील मातोश्री इमारतीत कारागिरांना चाकूचा धाक दाखवून त्यांना दोरीने बांधून त्यांच्याकडील ५० लाख रुपये किमतीचे दीड किलो ५० ग्रॅम सोने लुटून नेले.
रिधुरवाड्यात कैलास सोनवणे यांच्या मालकीच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ६ व ८ क्रमांकाच्या खोलीत १४ बंगाली कारागीर राहतात. ते तेथेच दागिने घडविण्याचे काम करतात. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास २५ ते ३५ वयोगटातील सहा जण एकाच वेळी इमारतीत आले. त्यातील तिघांकडे बॅग होती. नाशिकच्या प्राप्तिकर कार्यालयाकडून आल्याचे सांगून ते दोन्ही खोल्यामंध्ये शिरले.
तिघांनी बॅगा उघडून त्यातील चाकू व सुरा काढून कारागिरांच्या मानेला लावला. दोरी व पडदा कापून त्याच कपड्याने सर्वांचे हातपाय बांधले व तोंडावर पट्टी बांधली. त्यानंतर तिजोरी फोडून त्यातील पाऊण किलो (७५० ग्रॅम) सोने काढले. खोली क्रमांक ६ मधील कारागिरांना खोली क्रमांक ८ मध्ये आणून त्यांचेही हातपाय बांधले. सर्व कारागिरांना कोंडून दुसऱ्या खोलीतील तिजोरीतील ८०० ग्रॅम सोने काढून त्यांनी पोबारा केला. दरोड्याची घटना घडल्याचे समजताच अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शनी पेठचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्यासह कर्मचाऱ्यांची फौज घटनास्थळी दाखल झाली. श्वानपथक व फिंगर प्रिंट विभागानेही घटनास्थळी पाहणी केली. (प्रतिनिधी)