‘व्हॅलेंटाइन डे’ ला मावळातून ५० लाख गुलाब जाणार सातासमुद्रापार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 01:22 PM2020-02-04T13:22:43+5:302020-02-04T13:42:24+5:30
प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन डे’करिता सज्ज
विशाल विकारी -
लोणावळा : प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन डे’करिता सज्ज झाला आहे. मावळ तालुक्यात गुलाब फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. व्हॅलेंटाइन डे जेमतेम १० दिवसांवर आल्याने मावळातील गुलाब परदेशी बाजारपेठेत पाठविण्याकरिता फूल उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सुमारे ५० लाख गुलाबांची निर्यात होणार आहे. तसेच शेवटच्या चार दिवसांत देशांतर्गत बाजारपेठेतही गुलाब रवाना होणार आहे.
टॉप सिक्रेट नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला विदेशी बाजारात मोठी मागणी आहे. मावळ तालुक्यात सुमारे साडेसहाशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पॉलीहाऊसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. परदेशी बाजारात ‘व्हॅलेंटाइन डे’करिता गुलाब फुलांना मोठी मागणी असल्याने परदेशात जवळपास साठ टक्के फुले ही मावळातून निर्यात केली जातात. या वर्षी वातावरणात सतत बदल होत असल्याने त्याचा काही प्रमाणात फूल उत्पादनावर परिणाम झाला आहे.
........
विदेशी तसेच देशी बाजारपेठेत फुलांना चांगला भाव मिळेल ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून पवन मावळात चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव व मुकुंद ठाकर या पाच शेतकऱ्यांनी एकत्र येत पॉली हाऊसमधील माल विदेशी बाजारपेठेत विक्री करण्याची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. त्या माध्यमातून काम केले जाते. वाघू मोहोळ, सतीश मोहोळ व सचिन मोहोळ यांनीदेखील पॉलीहाऊसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेतले आहे. तळेगाव एमआयडीसी परिसरात शिवाजी भेगडे यांच्यासह काही शेतकरी मोठ्या प्रमाणात गुलाब फुलांचे उत्पादन घेतात.
४तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी वर्षभर गुलाब फुलांचे उत्पादन घेत असतात. ‘व्हॅलेन्टाइन डे’ला गुलाब फुलांना सर्वाधिक मागणी असल्याने या काळात जास्तीत जास्त गुलाब फुलांचे उत्पादन कसे होईल, याकरिता डिसेंबर महिन्यापासून शेतकरी नियोजन करतात.
.........
* टॉप सिक्रेट (लाल रंग), गोल्ड स्टाइक (पिवळा), आवलॉच (पांढरा), ट्रॉपिकल अॅमेझॉन (नारंगी)
* विदेशी बाजारपेठा : जपान व हॉलंड या प्रमुख बाजारपेठा.
* स्थानिक बाजारपेठा : दिल्ली ही मुख्य बाजारपेठ.यासह मुंबई, इंदूर, सुरत, अहमदाबाद, बडोदा, पुणे, जयपूर, लखनौ, जबलपूर, हैदराबाद व गोवा.