एकनाथ शिंदे गटाचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्र्यांनं स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 10:28 AM2022-10-25T10:28:20+5:302022-10-25T10:33:54+5:30
शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वत:ला भाजपात विलीन करून घेतील हे स्पष्ट दिसते असा दावा ठाकरे गटानं केला होता.
मुंबई - राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्त्वात या आमदारांनी भाजपाला पाठिंबा देत राज्यात नवं सरकार स्थापन केले. शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यात आता एकनाथ शिंदे गटाचे २२ आमदार नाराज असून ते भाजपात विलीन करून घेतील. ते भाजपाच्या संपर्कात आहेत असा दावा उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले.
उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गटाचे २२ नव्हे तर ५० आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपासोबत आमची मैत्री घट्ट आहे. त्यामुळे ठाकरे गटाला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात खोचक टीका त्यांनी केली आहे. तर ठाकरेंकडे राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच हे वक्तव्य केले जात आहे असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावला.
ठाकरे गटानं काय म्हटलं होतं?
महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वत:ला भाजपात विलीन करून घेतील हे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदेंचे काय होणार? एकनाथ शिंदे यांनी स्वत:बरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना माफ करणार नाही अशी टीका सामना मुखपत्रातून उद्धव ठाकरेंनी केली.
त्याचसोबत एकनाथ शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजपा स्वत:चे राजकारण करत राहील. भाजपाचे नेते सरळ सांगतात, शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत दिसतील. असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात शिंदेंचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत. पोलिसांच्या बदल्यांत व आपले अधिकारी नेमण्यात त्यांना जास्त रस आहे. कारण, त्यांच्या चाळीस आमदारांना ते सर्व करून हवे. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी हे बदली प्रकरण मानले नाही, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले व साताऱ्यातील गावी गेले, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. ते थेट क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनास अवतरले. मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो असंही ठाकरे गटानं आरोप केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"