उसाखालील ५० टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणार
By Admin | Published: November 24, 2015 03:03 AM2015-11-24T03:03:15+5:302015-11-24T03:03:15+5:30
राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी बहुतांशी क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मुंबई : राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी बहुतांशी क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उसाखालील किमान ५० टक्के क्षेत्र ठिंबक सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.
मंत्रालयात कृषी व पणन विभागाचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. या वेळी कृषी मंत्री एकनाथराव खडसे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री राम शिंदे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र १८.८७ लाख हेक्टर आहे. मात्र अवर्षण प्रवण क्षेत्र, अति उपसा झालेले पाणलोट क्षेत्र, जास्त पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकांचे क्षेत्र याकडे आता प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यातील उसाखालील किमान ५० टक्के क्षेत्र ठिंबक सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याची गरज आहे. यासाठी साखर कारखान्यांचा सहभाग आवश्यक आहे. किमान पहिल्या टप्प्यात दोन हेक्टर क्षेत्राचा समावेश करावा आणि उसासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करण्याला चालना देण्यासाठी प्रयत्न करावा. येत्या ५ वर्षांत ११.२५ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विकासासाठी पणन मंडळाच्या मूल्यमापनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
या वेळी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के. जैन यांनी सादरीकरण केले. (विशेष प्रतिनिधी)