५० टक्के लावण्या पावसाअभावी रखडल्या
By admin | Published: July 12, 2017 02:49 AM2017-07-12T02:49:45+5:302017-07-12T02:49:45+5:30
भात लावण्यांकरिता शेतात पाणी नसल्याने रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात लावण्या रखडल्या आहेत.
जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पावसाचा जोर गेल्या आठ दिवसांपासून असल्याने, भात लावण्यांकरिता शेतात पाणी नसल्याने रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात लावण्या रखडल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या प्रस्तावित आहेत. भात लावण्यांकरिता शेतात पाणी असावे लागते, पावसाअभावी शेते कोरडी झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी जवळचे ओढे आणि विहिरींचे पाणी शेतात घेऊन भात लावण्या केल्याने, जिल्ह्यात ५० टक्केच भात लावण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत; परंतु येत्या दोन-चार दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शेतातील पाणी आटून लावणी केलेली भातरोपे करपण्यास सुरुवात होण्याचा धोका असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भात पेरण्या, भातरोपे आणि लावण्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या अहवालातून नेमकी काय परिस्थिती आहे, याचे चित्र बुधवारी जिल्हास्तरीय कृषी बैठकीत स्पष्ट होईल. दरम्यान, अलिबाग व मुरुड तालुक्यातील दुबार भात पेरण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे अलिबागचे कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी यांनी सांगितले, तर महाड, पोलादपूर, म्हसळा व श्रीवर्धन या चार तालुक्यांतही दुबार पेरणीची गरज नसल्याचे महाडचे कृषी अधिकारी व्ही. आर. साळवी यांनी सांगितले. प्राथमिक उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात दुबार भात पेरण्यांची गरज नसल्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. डी. शिगेदार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या अपेक्षित आहेत. त्याकरिता आवश्यक भातरोपांची निर्मिती ३५ हजार हेक्टरांवरील भात पेरण्यामधून होत आहे. सद्यस्थितीत भातरोपे चांगली व दमदार झाली आहेत. मात्र, पावसाने अधिक ओढ दिल्यास या भातरोपांना धोका आहे. दुबार भात पेरण्याचे संकट सद्यस्थितीत रायगडमध्ये नसले तरी येत्या चार दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर लावणी केलेली भातरोपे करपण्याची भीती आहे.
अशाप्रकारे भातरोपे करपल्यास पुन्हा भात पेरण्या करून भातरोपांच्या निर्मितीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकते, अशी भीती शेतकरी महेश्वर देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
>शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे
जिल्ह्यात गतवर्षी जुलै २०१६पर्यंत सरासरी पर्जन्यमान ९९३ मि.मी. झाले होते, ते यंदा १००१.२८ झाले आहे. ८ जून रोजी मृग नक्षत्रावर आलेल्या पावसाने ओढ दिली होती; परंतु २१ जून रोजी आलेल्या आर्द्रा नक्षत्राचा पाऊस जिल्ह्यात चांगला झाला. परिणामी, भात पेरणीअंती भातरोपांची उगवण उत्तम झाली आणि भात लावण्या ५० टक्के पूर्ण होऊ शकल्या; परंतु ५ जुलै रोजी आलेल्या पुनर्वसू नक्षत्रांच्या पावसाने मात्र पुन्हा ओढ दिल्याने उर्वरित ५० टक्के भात लावण्या अडचणीत आल्या आहेत. १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्राचा पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे; परंतु तोपर्यंत भातरोपे वाचविण्यासाठी पाण्याचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागेल, असा पर्जन्य अंदाज नक्षत्र-पर्जन्य अभ्यासक डॉ. संजय टिळक यांनी व्यक्त केला आहे.