दारूच्या कारखान्यांचं 50 टक्के पाणी कापा - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश
By Admin | Published: April 22, 2016 04:37 PM2016-04-22T16:37:19+5:302016-04-22T16:52:18+5:30
मद्यनिर्मिती कारखान्यांना 10 मे पर्यंत 50 टक्के पाणीकपात लागू करावी असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिला आहे
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - मद्यनिर्मिती कारखान्यांना 10 मे पर्यंत 50 टक्के पाणीकपात लागू करावी असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिला आहे. मराठवाड्यामधल्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असताना मद्यनिर्मितीसाठी पाणी देऊ नये अशी मागणी केली जात होती. राज्यामधले आयपीएलचे सामनेही अन्य राज्यांमध्ये हलवण्याचे आदेश न्यायालयांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दारूच्या निर्मितीवर सध्या बहुमोलाचे असलेले पाणी व्यर्थ घालवायचे का असा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या संदर्भात मध्यममार्गी भूमिका घेत खंडपीठाने संपूर्ण पाणीबंदीचा आदेश न देता, 50 टक्के पाणी कपातीचा आदेश दिला आहे.
दरम्यान, दुष्काळग्रस्त भागात सेल्फीमुळे वादात सापडलेल्या भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणी बंद करू नये असे मत व्यक्त केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी पंकजा मुंडे यांच्या पतीचा मद्यनिर्मितीचा कारखाना असल्यामुळे त्या या कारखान्यांच्या पाणीकपातीला विरोध करत असल्याचा आरोप केला होता.