रोज ५० हजार किलो तूरडाळ बाजारात

By admin | Published: November 8, 2015 01:18 AM2015-11-08T01:18:35+5:302015-11-08T01:18:35+5:30

व्यापारी सरकारसोबतच दुटप्पी राजकारण करत असल्याचे पाहून, अखेर सरकारने बिग बझार, रिलायन्स, सहकार भांडार या साखळी दुकानांना हाताशी धरले आणि ९९ रुपये किलो

50 thousand kg of turdal market every day | रोज ५० हजार किलो तूरडाळ बाजारात

रोज ५० हजार किलो तूरडाळ बाजारात

Next

- अतुल कुलकर्णी,  मुंबई
व्यापारी सरकारसोबतच दुटप्पी राजकारण करत असल्याचे पाहून, अखेर सरकारने बिग बझार, रिलायन्स, सहकार भांडार या साखळी दुकानांना हाताशी धरले आणि ९९ रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून दिली. आततायीपणे अधिकाऱ्यांनी डाळीवर प्रक्रिया करणाऱ्या काही मिलदेखील ताब्यात घेतल्या होत्या. त्यावरील बंधने काढण्यात आल्याने रविवारपासून महाराष्ट्रातल्या बाजारात रोज ५० हजार किलो तूरडाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ज्यांनी साठे करून ठेवले व जे १७० रुपयांच्या खाली डाळ विकण्यास तयार नव्हते, त्यांनादेखील आता डाळ १०० रुपये किलोने विकावी लागणार आहे. शुक्रवारी अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बिग बझारसोबत चर्चा केली आणि त्यांना तातडीने डाळीचा पुरवठाही केला. शनिवारी बिग बझारने ९९ रुपये किलोने डाळ विकणार, अशा जाहिराती दिल्या. दरम्यानच्या काळात सहकार भांडार आणि रिलायन्स यांच्याशीही बोलणी पूर्ण करून त्यांनाही ९४ रुपये किलो दराने डाळीचा पुरवठा सुरू केला. त्यावर हाताळणी खर्च म्हणून त्यांनी ६ रुपये घ्यावे आणि १०० रुपये किलोने डाळ विकावी, असे सांगण्यात आले. मंगळवारनंतर दररोज १ लाख किलो डाळीचा पुरवठा सुरूहोईल, असेही मंत्री बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राज्यात डाळीची मागणी व या संदर्भातील केंद्र शासनाने आदेश काढले का, या विषयी मुंबई ग्राहक पंचायतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले, तेव्हा असे आदेश आपल्याकडे आलेत का, याचा शोध घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी केल्या. मंत्रालयातील अधिकाऱ्यांमधील सुस्तपणाबद्दल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व अधिकाऱ्यांना राज्यभर दौरे करण्याचे आदेशही दिले.

मुंबई ग्राहक पंचायतीने मागितली माहिती
राज्यात दरवर्षी किती किलो डाळ लागते?, राज्यात डाळीचे उत्पन्न किती होते?, परदेशातून येणारी किती डाळ आपल्या राज्यात राहते आणि किती डाळ अन्य राज्यांत जाते? अशा कोणत्याही प्रश्नांचा अभ्यास अन्न व पुरवठा विभागाने केलेला नाही. त्यांच्याकडे या संबंधीची आकडेवारी उपलब्ध नाही. मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयावर लक्ष वेधण्यासाठी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या संबंधी केंद्र शासनाने कोणते आदेश काढले आहेत का, याची माहिती विचारली होती.

Web Title: 50 thousand kg of turdal market every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.