देशात किडनी प्रत्यारोपणाचे ५० वर्ष पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 10:54 AM2021-02-02T10:54:53+5:302021-02-02T10:57:02+5:30
kidney transplant भारतात पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण २ फेब्रुवारी १९७१ रोजी झाले असून, त्याला आज पाच दशके पूर्ण झाली.
अकोला: मानवी शस्त्रक्रियेमधील अवयव प्रत्यारोपण ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे; परंतु यामध्येही किडनी प्रत्यारोपण सर्वात यशस्वी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात किडनी प्रत्यारोपणाला २ फेब्रुवारी २०२१ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहे. दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानही विकसित झाले; मात्र राज्यात किडनी प्रत्यारोपणासाठी मर्यादित केंद्रे तसेच संकलनावेळी येणाऱ्या अडचणी, हे आजही मोठे आव्हान आहे.
भारतात पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण २ फेब्रुवारी १९७१ रोजी झाले असून, त्याला आज पाच दशके पूर्ण झाली. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर ही किडनी प्रत्यारोपणाची महत्त्वाची केंद्रे आहेत. मागील ५० वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे किडनी प्रत्याराेपण पूर्वीच्या तुलनेत सोपे झाले, तरी गरजू रुग्णासाठी किडनी उपलब्ध होणे आजही कठीण आहे. २०१६ मध्ये मोहन फाउंडेशनचे डॉ. सुनील श्रोफ यांनी केलेल्या पाहणीनुसार, भारतात दरवर्षी साधारणतः २ लाख २० हजार रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज भासते. त्यापैकी फक्त ७,५०० रुग्णांची शस्त्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे किडनी दानासाठी जनजागृतीची गरज आहे.
भारतातील किडनी प्रत्यारोपणाचा प्रवास
केईएम मुंबईमधील डॉ. पी. के. सेन यांनी कुत्र्यांवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करून अनुभव संपादन केला. त्यानंतर डॉ. सेन यांच्या चमूने व वाराणशी येथील डॉ. उडुपा यांच्या चमूने १९६५-६६ मध्ये मानवी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली; पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर २ फेब्रुवारी १९७१ रोजी डॉ. मोहन राव व डॉ. जॉनी यांच्या चमूने वेल्लोर येथे भारतातील पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले. या चमूने ऑस्ट्रेलियामधून या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले होते.
किडनी प्रत्यारोपणाला आज पाच दशके पूर्ण होत आहे; परंतु समाजात आजही अनेक गैरसमज आहे. हे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. किडनी ट्रान्सप्लांटसाठी शासनाच्या विविध योजना असल्याने त्यासाठी येणारा खर्चही कमी आहे. इतर कोणत्याही अवयवाच्या तुलनेत किडनी प्रत्यारोपण सर्वात यशस्वी शस्त्रक्रिया आहे. इतर मोठ्या शहरांप्रमाणेच लहान शहरांमध्येही आज किडनी प्रत्यारोपण शक्य आहे.
- डॉ. प्रशांत मुळावकर, मानद सचिव, युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभाग, अकोला