अपहार करणाऱ्यांना ५00 ते ७५0 पट दंड
By admin | Published: September 19, 2016 05:26 AM2016-09-19T05:26:40+5:302016-09-19T05:26:40+5:30
एसटी वाहकांकडून अपहार केल्याने वर्षाला मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो.
मुंबई : एसटी वाहकांकडून अपहार केल्याने वर्षाला मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो. त्यामुळे अपहार करणाऱ्या वाहकांना चाप बसावा यासाठी वाहकांना अंतर्भुत रकमेच्या ५00 ते ७५0 पट दंड वसूल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीस आॅगस्ट महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एसटी वाहतूक खात्याच्या मार्ग तपासणी किंवा सुरक्षा व दक्षता पथकातील कर्मचाऱ्यांनी अपहार करणाऱ्या वाहकांना पाठीशी घातल्यास त्यांनाही ७५ ते १५0 पट दंड आकारण्यात येईल.
तिकिटांची पुनर्विक्री करणे, कमी दराची तिकिटे देणे, अनियमित तिकिटे देणे, प्रवासभाडे वसूल करून तिकीट देणे, प्रवासभाडे वसूल न करणे व तिकीट न देणे इत्यादी प्रकारे एसटी वाहकांकडून अपहार केला जातो. त्याबाबतच्या तक्रारी प्रवाशांकडूनही एसटीकडे करण्यात येतात. त्याचप्रमाणे अपहार होत असल्याची बाब एसटी अधिकाऱ्यांच्याही निदर्शनास आली. एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभाग आणि वाहतूक विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वाहकांकडून करण्यात येत असलेल्या अपहारामुळे वर्षाला तब्बल ५00 कोटींचा महसूल बुडत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात काही वेळेला वाहकांना निलंबितही केले जाते. त्यातून अपहाराची रक्कम मात्र फारशी काही वसूल होत नाही. त्यामुळे अपहाराचे प्रकार थांबावेत, महसूलही मिळावा आणि अपहाराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघावी यासाठी एसटी महामंडळाने अपहार करणाऱ्या वाहकांवर निलंबन कारवाईऐवजी तडजोडीची व मोठ्या दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला व तसा प्रस्ताव तयार करून आॅगस्ट महिन्यात सर्व प्रादेशिक कार्यालय व विभागीय कार्यालयांसाठी परिपत्रकच काढले. प्रवासभाडे वसूल करून तिकीट न दिल्याचे आढळल्यास प्रथम दर्शनी अंतर्भुत रकमेच्या ५00 पट किंवा दहा हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती वसूल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुसऱ्यांना अपहार जास्त असले तर ७५0 पट किंवा १५ हजार यापैकी जी रक्कम जास्त असेल ती वसूल करावी; तर तिसऱ्यांदा निलंबितच करून आरोपपत्र ठेवून कार्यवाही करण्यात येणार आहे. अपहार प्रकरणातही अंतर्भुत रकमेच्या १00 पट व एक हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती वसूल केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
>सवलतीच्या दरातील पासेसची खातरजमा न करता प्रवाशाला सवलतीच्या दरात प्रवास करण्याची मुभा देणे,
४० किमीच्या पुढील प्रवासात एसटी कर्मचारी विनातिकीट आढळणे, एसटीचा कर्मचारी म्हणून तोतया इसमास पुरेशी खात्री करुन न घेता प्रवास करण्याची मुभा देणे, कौटुंबिक पासाचा गैरवापर केल्यास १ हजार रुपये रक्कम वसूल करण्याचेही परिपत्रकात नमूद केले आहे.
>सुरक्षा व तपासणी विभागातील कर्मचाऱ्यांनाही दंड
विनातिकीट प्रवास किंवा तिकीट न देणे अशा वाहकांकडून झालेल्या अपहार प्रकारात सुरक्षा व दक्षता खात्यातील किंवा मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्याने वाहकाला पाठीशी घातल्यास त्यांनाही दंड आकारला जाणार आहे. प्रथम अंतर्भुत रकमेच्या ७५ पट परंतु किमान १० हजार रुपये इतकी नुकसानभरपाई, दुसऱ्यांदा अंतर्भुत रकमेच्या १५0 पट परंतु किमान २० हजार रुपये नुकसानभरपाई वसूल करण्याच्या सूचना आहेत.
आणखी काही कार्यवाही पुढीलप्रमाणे असेल
१) तिकिटाची पुनर्विक्री करणे, कमी दराची तिकिटे देणे, अनियमित तिकीट विक्री करणे - तडजोड नाही. शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
२) रक्कम जादा - अंतर्भुत रकमेच्या १00 पट किंवा एक हजार यापैकी जी रक्कम जादा असेल ती वसूल करावी.
३) प्रवासभाडे वसूल न करणे व तिकीट न देणे-
- बस आसनक्षमता व मंजूर असलेले उभे प्रवासी संख्या यापेक्षा जास्त प्रवासी असतील तर कार्यपद्धतीप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
- बस आसन क्षमतेपेक्षा कमी प्रवासी असतील तर...
प्रथम गुन्हा- अंतर्भुत रकमेच्या १00 पट किंवा दोन हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती वसूल केली जाईल.
द्धितीय गुन्हा- अंतर्भुत रकमेच्या २00 पट किंवा पाच हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती वसूल करावी.
तृतीय गुन्हा- शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार आरोपपत्र देऊन कारवाई केली जावी.
४) रक्कम कमी- ५0 पट किंवा एक हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती वसूल करावी.
अपहार करणाऱ्या वाहकांना आळा बसावा आणि अपहाराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघावी यासाठी अशाप्रकारे दंड आकारण्यात येणार आहे. आॅगस्ट महिन्यापासून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे.
- रणजित सिंह देओल, एसटी महामंडळ, व्यवस्थापकीय संचालक