जामिनासाठी पैसे नसल्याने ५०० आरोपी तुरुंगातच!
By Admin | Published: March 6, 2016 03:53 AM2016-03-06T03:53:55+5:302016-03-06T09:09:51+5:30
जामिनासाठी पैसे नसल्याने राज्यातील विविध कारागृहांमध्ये ५००पेक्षा अधिक कैदी वर्षानुवर्षे खितपत पडल्याचे वास्तव समोर आले आहे. या आरोपींकडे जातमुचलक्याचे १० ते १५ हजार रुपयेही नाहीत.
मुजीब देवणीकर, औरंगाबाद
जामिनासाठी पैसे नसल्याने राज्यातील विविध कारागृहांमध्ये ५००पेक्षा अधिक कैदी वर्षानुवर्षे खितपत पडल्याचे वास्तव समोर आले आहे. या आरोपींकडे जातमुचलक्याचे १० ते १५ हजार रुपयेही नाहीत. एकीकडे कारागृहांमध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसताना प्रशासनाला मात्र त्यांचा सांभाळ करावा लागत आहे, अशी माहिती ‘राईटस् आॅफ सिटिझन इन डेमोक्रॅटिक इंडिया’ संस्थेला माहिती अधिकारातून मिळाली.
देशात दरवर्षी २८ लाखांहून अधिक गुन्हे दाखल होतात. त्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २ लाख ५० हजार गुन्हे दरवर्षी दाखल होतात. ९९ टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक होते. राज्यातील कारागृहांमध्ये सध्या २५ हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यात ५००पेक्षा अधिक आरोपींच्या कुटुंबीयांना जामिनाचे पैसे गोळा करता न आल्याने ते तुरुंगातच आहेत. महाराष्ट्रात ९ मध्यवर्ती कारागृहे आहेत. त्यात ३१ जिल्हा, १३ खुली, १ खुली वसाहत आणि १७२ उप-कारागृहांचा समावेश आहे. या कच्च्या कैद्यांना जामीन मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जामिनास कोणाला किती पैसे लागणार, याचा आढावा घेत आहोत.
- अॅड. कादरी अन्वर अहमद,
राईटस् आॅफ सिटिझन इन डेमोक्रॅटिक इंडिया