वरोऱ्यात ५०० च्या बनावट नोटा
By admin | Published: August 6, 2014 01:10 AM2014-08-06T01:10:38+5:302014-08-06T01:10:38+5:30
शहरात मोठ्या प्रमाणावर ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका बँकेत एकाच दिवशी वेगवेगळ्या
नागरिकांमध्ये भीती : बँकेत उघडकीस
वरोरा : शहरात मोठ्या प्रमाणावर ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका बँकेत एकाच दिवशी वेगवेगळ्या ग्राहकांजवळ सहा ५०० च्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित सर्व ग्राहक बँकेचे खातेदार असून ते व्यावसायिक आहेत. हे खातेदार बँकेत रक्कम जमा करीत असताना बनावट नोटांची बाब रोखपालाच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
वरोरा परिसरात मागील काही दिवसांपासून ५०० च्या बनावट नोटा चलनात असल्याची चर्चा केली जात होती. एखादी ५०० ची नोट बनावट आढळल्यास नागरिक पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ती नोट आपल्याजवळ ठेवत असत. दरम्यान, शहरातील काही एटीएम मशीनमधूनही पाचशेच्या बनावट नोटा निघाल्याचे सांगण्यात येते. मात्र याच नोटा बँकही स्वीकारण्यास नकार देत असल्याने ग्राहक हा प्रकार निपूटपणे सहन करुन घेत होते. शहर व ग्रामीण भागातील व्यावसायिक दिवसभरातील आपला व्यवसाय सांभाळून दुपारी किंवा सायंकाळी बँकेत रोख रक्कम जमा करतात. असेच काही व्यावसायिक सोमवारी बँकेत रोख रक्कम जमा करण्याकरिता गेले असता, वेगवेगळ्या ग्राहकांजवळील नोटांच्या बंडलमध्ये पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटा आढळून आल्या. रकमेची मोजणी करताना रोखपालाच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे रोखपालाने सदर नोटा घेण्यास नकार दिला. त्याचा फटका या व्यावसायिकांना बसला. अनेक व्यावसायिक ५०० रुपयांची बनावट नोट आढळल्यास व रोखपालने ती स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्याऐवजी दुसरी नोट देऊन बनावट नोट परत घेऊन निघून जातात. बँकेत बनावट नोट प्राप्त झाल्यास रोखपाल त्यावर लाल अक्षराने रेषा मारत असल्याने सदर नोट पुन्हा चलनात येत नाही. परंतु याबाबत चौकशीचा ससेमीरा लागत असल्याने बँक किंवा व्यावसायिक व नागरिकही पोलिसांकडे याबाबत तक्रार करीत नसल्याने बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. (तालुका प्रतिनिधी)