मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ५०० कोटी
By Admin | Published: March 19, 2016 02:09 AM2016-03-19T02:09:03+5:302016-03-19T02:09:03+5:30
राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यातही ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ हाती घेण्यात आली असून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात
मुंबई : राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यातही ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ हाती घेण्यात आली असून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी ‘स्मार्ट गाव योजना’ प्रस्तावित केली असून या योजनेमध्ये पंचायत समितीस्तरावर ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा होईल व त्यामध्ये तालुका तसेच जिल्हा स्तरावर स्मार्ट ग्रामपंचायतींची निवड करून त्यांनी प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘डिजिटल बोर्ड’ बसविण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागाचा विकास जलदगतीने होण्यासाठी ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियान’ प्रस्तावित आहे. यामध्ये नवीन ग्रामपंचायतींचे बांधकाम, तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करणे, जिल्हा परिषद प्रभाग बळकट करणे आदींसाठी एक कोटीचा निधी उपलब्ध केला आहे.
सुमतीताई सुकळीकर योजना
महिला स्वयंसहाय्यता समूहांना शून्य टक्के दाराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबविली जाईल. त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद वित्त मंत्र्यांनी केली. सुमतीताई सुकळीकर या जनसंघ-भाजपाच्या नागपुरातील ज्येष्ठ नेत्या होत्या. भाजपामधील आजच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांसाठी त्या आदरस्थानी होत्या. नानाजी देशमुख यांच्या सहकार्याने त्यांनी नागपुरात बालजगत ही संस्था उभी केली.